नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या टी-२० विश्वचषकातील अभियानाची सुरुवात चांगली झालेली नाही. भारताला सलामीच्या लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा सर्वच क्षेत्रात पाकिस्तानचा संघ भारतावर वरचढ ठरला होता. या सामन्यानंतर विराट कोहलीने पाकिस्तानच्या संघाचं कौतुक केलं होतं. तसेच पाकिस्तानी संघाने आम्हाला एकतर्फी पराभूत केलं, असं सांगितलं होतं. दरम्यान, सामन्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघाबाबत केलेल्या विधानाबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने नाराजी व्यक्त केली आहे. विराट कोहलीचे हे वक्तव्य ऐकून निराशा झाली, असे अजय जडेजाने म्हटले आहे.
जडेजाने क्रिकबझ हिंदीशी बोलतावा सांगितले की, मी त्या दिवशी विराट कोहलीचे वक्तव्य ऐकलं होतं. तो म्हणाला की, जेव्हा आम्ही दोन विकेट गमावल्या होत्या, तेव्हा आम्ही सामन्यात पिछाडीवर पडलो होतो. मला त्याचं म्हणणं आवडलेलं नाही. जेव्हा विराट कोहलीसारखा फलंदाज खेळ असतो, तेव्हा सामना संपलेला नसतो. त्याने तेव्हा दोन चेंडूही खेळलेले नव्हते आणि तो अशा प्रकारे विचार करत होता, ही बाब भारतीय संघाच्या मानसिकतेला अधोरेखित करते.
आता भारताला पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पुढील सामन्यांमध्ये विजय मिळवणे परवडणारे नाही. ३१ ऑक्टोबर रोजी भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. जर भारतीय संघ या सामन्यात भारताला विजय न मिळाल्यास भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश हा जवळपास अशक्य होणार आहे. तसेच रनरेटवरही मामला फसू शकतो. न्यूझीलंडनंतर भारताचा सामना अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाशी होणार आहे. न्यूझीलंडलाही पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भारताकडून पराभव झाला तर न्यूझीलंडचाही उपांत्य फेरीतील प्रवेश अनिश्चित असेल.