नवी दिल्ली - रविवारी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये न्यूझीलंडचा विजय झाल्याने भारताचे आयसीसी टी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या पराभवाचे विश्लेषण आता सुरू झाले आहे. तसेच संघाच्या पराभवामागची विविध कारणे आता सांगितली जात आहेत. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ समालोचक सुनील गावस्कर यांनी आयसीसी टी-२० विश्वचषकात झालेल्या भारतीय संघाच्या पराभवाचे एकमेव कारण सांगितले आहे. तुल्यबळ संघांविरोधात भारतीय फलंदाजांना धावा बनवण्यात आलेले अपयश हे भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषकामधील पराभवाचे मुख्य कारण आहे, असे गावस्कर म्हणाले. तसेच पॉवर प्लेच्या षटकांमधील खेळाबाबत भारतीय संघाने आपली भूमिका बदलण्याची गरज असल्याचेही गावस्कर म्हणाले.
सुपर-१२ फेरीतील पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्याने भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाला. त्या पराभवांनंतर अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्धच्या लढतींमध्ये जोरदार खेळ करत भारताने पुनरागमन केले. मात्र अफगाणिस्तानला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागल्याने अखेरीस भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
गावस्कर याबाबत म्हणाले की, ज्या प्रकारे पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आमच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला त्यांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. तेच भारताच्या सुमार कामगिरीचे कारण ठरले. मैदानात पडणाऱ्या दवामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे जात होते. चेंडू फिरकी घेत नसल्याने स्पिनर्सचे चेंडू सरळ जात होते. नंतर फलंदाजी करण्याचा फायदा होता. मात्र तुम्ही प्रथम फलंदाजी करताना १८० धावा बनवल्या असत्या तर बचावासाठी गोलंदाजांना २०-३० अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या. जेव्हा तुम्ही न्यूझीलंडविरुद्ध १११ धावा जमवता तेव्हा दवाला काहीच अर्थ राहत नाही. आम्ही धावाच केल्या नाहीत, तेच पराभवाचे मुख्य कारण ठरले आणखी काही नाही.
दरम्यान, भारतीय संघामध्ये मोठे फेरबदल करण्याची गरज नसल्याचेही सुनील गावस्कर यांनी सांगितले. भारतीय संघामध्ये मोठे बदल करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. तर संघाच्या मानसिकतेमध्ये बदल होण्याची गरज आहे. त्यात पॉवर प्लेमधील षटकांचा फायदा उठवण्यासाठी रणनीती आखणे गरजेचे आहे. पहिल्या ६ षटकांमध्ये केवळ दोन क्षेत्ररक्षक बाहेर असतात आणि भारताना आयसीसीच्या काही स्पर्धांमध्ये याचा फायदा उचललेला नाही.
जेव्हा जेव्हा भारतीय संघाचा सामना तुल्यबळ संघासोबत झाला, ज्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, अशा संघासोबत झाला तेव्हा भारतीय संघाला धावा जमवण्यात अपयश आले. यामध्ये बदल होण्याची गरज आहे. गावस्कर यांनी सुमार क्षेत्ररक्षण हे भारतीय संघाच्या अपयशाचे आणखी एक कारण असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.