दुबई - ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवाबरोबरच वेस्ट इंडिजचे आयसीसी टी-२० विश्वचषकातील अभियान संपुष्टात आले आहे. वेस्ट इंडिजकडून ड्वेन ब्राव्होचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने आपल्या निवृत्तीची आधीच घोषणा केली होती. दरम्यान, सामना गमावल्यानंतर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल हा ज्याप्रकारे मैदानातून बाहेर आला ते पाहून त्याने शेवटचा टी-२० सामना खेळला आहे, असे दिसत आहे. फलंदाजी करताना १५ धावा करून माघारी परतत असताना ख्रिस गेलने बॅट दाखवून प्रेक्षकांना ज्या प्रकारे अभिवादन केले, तसेच ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यावर संघातील सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून, गळाभेट घेऊन स्वागत केले, त्यावरून त्याने निवृत्ती स्वीकारल्याचा अंदाज बांधला जात आहे.
एवढेच नाही तर सामना संपल्यावर ऑस्ट्रेलियन संघाने ब्राव्होबरोबरच ख्रिस गेललाही गार्ड ऑफ ऑनरही दिला. समालोचक इयान बिशप यांनी सामन्यादरम्यान, आपण ख्रिस गेलला वेस्ट इंडिजच्या जर्सीमध्ये पाहत आहोत. एवढेच नाही तर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही गेलला त्याच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत, त्याचे उत्तर देताना गेलने आफ्रिदीचे आभार मानले आहेत.
दरम्यान, सामन्याआधी निवृत्तीची घोषणा का केली नाही, यामागचं कारण गेलने सांगितले आहे. या स्पर्धेत आपली कामगिरी सर्वोत्तम झाली नाही, हे गेलने मान्य केले. पाच सामन्यात मिळून गेलला केवळ ४५ धावाच जमवता आल्या. तसेच वेस्ट इंडिजलाही सुपर-१२ फेरीत केवळ एकच विजय मिळवता आला.
आयसीसीसोबत बोलताना ख्रिस गेलने सांगितले की, मी शेवटच्या सामन्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करत होतो. हा विश्वचषक आमच्यासाठी खूप निराशाजनक ठरला. माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात हे क्षण आले हे माझ्याासठी दु:खद आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी अजून खूप काही करणे बाकी आहे. खूप चांगले खेळाडू समोर येत आहेत. मी त्यांच्यासोबत सहाय्यकाची भूमिका निभाऊ शकतो. तसेच वेस्ट इंडिज क्रिकेटला शुभेच्छा देतो. मी निवृत्तीची घोषणा केलेली नाही. मात्र जर त्यांनी मला जमैकामध्ये घरच्या मैदानावर खेळण्याची संधी दिली तर मी त्यांचे आभार मानेन. मात्र याबाबत आतातरी मी काही सांगू शकत नाही.