ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live Updates: यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील इंग्लंडचा विजयी रथ द.आफ्रिकेनं रोखत अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात आफ्रिकेनं १० धावांनी विजय प्राप्त केला आहे. अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी १४ धावांची आवश्यकता असताना कगिसो रबाडानं पहिल्या तीन चेंडूत इंग्लंडच्या तीन फलंदाजांना माघारी धाडत संघासाठी विजयश्री खेचून आणली. विशेष म्हणजे त्या आधीच्या षटकात इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोन यानं रबाडाला सलग तीन चेंडूवर तीन उत्तुंग षटकार ठोकले होते. यातला एक षटकार तब्बल ११२ मीटर लांब होता आणि हा षटकार यंदाच्या स्पर्धेतील सर्वात उत्तुंग षटकार ठरला. रबाडानं अखेरच्या षटकात याचा वचपा काढत इंग्लंडच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं आणि हॅट्ट्रीकची नोंद केली.
लियाम लिव्हिंगस्टोन आणि डेव्हिड मलान यांची तुफान फटकेबाजी पाहता द.आफ्रिकेचं १९० धावांचं आव्हान इंग्लंड सहज पूर्ण करेल अशी परिस्थिती होती. पण अखेरच्या दोन षटकांमध्ये सामन्याचं रुप पालटलं आणि द.आफ्रिकेनं सामना १० धावांनी जिंकला. दरम्यान, द.आफ्रिकेनं सामना जिंकला असला तरी संघाचं स्पर्धेतील आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे. गुणातालिकेत संघाला ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचेही प्रत्येक ८ गुण आहेत. पण नेट रनरेटच्या जोरावर दोन्ही संघ पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
द.आफ्रिकेनं दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. जेसन रॉयनं २० आणि जोस बटलरनं २६ धावा केल्या. जेसन रॉय दुखापतीमुळे तंबूत परतला होता. त्यानंतर मोइन अलीनं २७ चेंडूत ३७ धावा ठोकल्या. तर डेव्हिड मलान यानं २६ चेंडूत ३३ धावा ठोकून संघाच्या धावसंख्येला आकार दिला. लियाम लिव्हिंगस्टोननं १७ चेंडूत खणखणीत २८ धावा करुन सामन्यात रंगत आणली होती. तर कर्णधार इयॉन मॉर्गननं १२ चेंडूत १७ धावा केल्या. पण सामना जिंकून देण्यात मॉर्गनला यश आलं नाही. अखेरच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात मॉर्गन माघारी परतला. अखेरच्या षटकात कगिसो रबाडानं हट्ट्रीक नोंदवत सामना खिशात टाकला.
इंग्लंड सामन्याची नाणेफक इंग्लंडनं जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात थोडी संथ झाली होती. सलामीवीर हेंड्रीक्स अवघ्या २ धावा करुन माघारी परतला होता. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि वान डर दुसेन यांनी संघाच्या धावसंख्येला आकार दिला. इंग्लंडचा फिरकीपटू अब्दुल राशीदनं डी कॉकला ३४ धावांवर बाद करत इंग्लंडला दुसरं यश मिळवून दिलं. वान डर दुसेन यानं स्फोटक फलंदाजी सुरुच ठेवत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दक्षिण आफ्रिकेनं आजचा सामना चांगल्या सरासरीनं जिंकला तर गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाला मागे सारुन उपांत्य फेरीत धडक मारण्याची संधी आफ्रिकेकडे होती.