ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज शारजाच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात द.आफ्रिकेच्या संघानं विजयासाठी १९० धावांचं आव्हान ठेवलं आहे. वान डर दुसेन यानं ६० चेंडूत नाबाद ९४ धावांची तर अॅडन मार्करम यानं २५ चेंडूत ५२ धावांची तुफान खेळी साकारली. सलामीवीर क्विंटन डी कॉक यानं ३४ धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या तगड्या आव्हानामुळे ऑस्ट्रेलियाचं मात्र टेन्शन वाढलं आहे.
इंग्लंड सामन्याची नाणेफक इंग्लंडनं जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात थोडी संथ झाली होती. सलामीवीर हेंड्रीक्स अवघ्या २ धावा करुन माघारी परतला होता. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि वान डर दुसेन यांनी संघाच्या धावसंख्येला आकार दिला. इंग्लंडचा फिरकीपटू अब्दुल राशीदनं डी कॉकला ३४ धावांवर बाद करत इंग्लंडला दुसरं यश मिळवून दिलं. वान डर दुसेन यानं स्फोटक फलंदाजी सुरुच ठेवत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दक्षिण आफ्रिकेनं आजचा सामना चांगल्या सरासरीनं जिंकला तर गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाला मागे सारुन उपांत्य फेरीत धडक मारण्याची संधी आफ्रिकेला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेला आजचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या गुणांची बरोबरी करता येणार आहे. त्यात द.आफ्रिकेनं इंग्लंड विरुद्ध चांगल्या फरकानं विजय प्राप्त केला तर ऑस्ट्रेलियाला नेट रनरेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला मागे सारुन उपांत्य फेरीचं तिकीट मिळवता येणार आहे.