ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan Scoreacard Live updates : मिस्ट्री फिरकीपटू म्हणून वर्ल्ड कप संघात स्थान पटकावणाऱ्या वरुण चक्रवर्थीला दोन सामन्यांत काही खास करता आले नाही. त्यात त्याच्या फिटनेसबाबत शंका होतीच आणि तिसऱ्या लढतीपूर्वी त्यानं माघार घेतली. दुखापतीमुळेच तो आज खेळू शकला नाही आणि अनुभवी फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याची संघात एन्ट्री झाली. भारताच्या २ बाद २१० धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा निम्मा संघ ६९ धावांवर माघारी परतला. आर अश्विननं ४ षटकांत १४ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. पाच वर्षांनंतर त्यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पहिली विकेट घेतली.
रोहित शर्मा व लोकेश राहुल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध २ बाद २१० धावांचा डोंगर उभा केला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये २००+ धावा करणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. रोहित ४७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकार खेचून ७४ धावांवर माघारी परतला. लोकेश ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा करून माघारी परतला. यानंतर हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनीही वाहत्या गंगेत हात धुतले. रिषभ पंतनं १३ चेंडूंत २७ ( १ चौकार व ३ षटकार) धावा केल्या, तर हार्दिक पांड्यानं १३ चेंडूंत ३५ ( ४ चौकार व २ षटकार) धावा करताना टीम इंडियाला २ बाद २१० धावांचा पल्ला गाठून दिला
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानला मोहम्मद शमीनं पहिला धक्का दिला. मोहम्मद शाहजाद ( ०) तिसऱ्या षटकात बाद झाला. पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहनं अफगाणिस्तानची दुसरी विकेट काढली. हझरतुल्लाह झजाई १३ धावा करून बाद झाला. रहमतुल्लाह गुरबाज व गुलबदीन नैब यांनी काही उत्तुंग फटके मारून अफगाणिस्तानच्या चाहत्यांना खूश केलं. रवींद्र जडेजानं ही जोडी तोडली व गुरबाज १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर आर अश्विननं अफगाणिस्तानच्या नैब ( १८) व नजिबुल्लाह झाद्रान ( ११) यांची विकेट काढली. अश्विननं पाच वर्षांनंतर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये विकेट घेतली. चार वर्षांनंतर ट्वेंटी-२० संघात पदार्पण करणाऱ्या अश्विननं २८ ऑगस्ट २०१६मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ११ धावांत २ विकेट्स घेतल्या होत्या आणि ५२ वरून ५३ विकेट्स करण्यासाठी त्याला पाच वर्ष वाट पाहावी लागली.