ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan Scoreacard Live updates : आज टीम इंडिया संपूर्ण ताकदीनं खेळत असल्याचे जाणवले. रोहित शर्मा ( Rohit sharma) व लोकेश राहुल ( KL Rahul) आधीच्या दोन सामन्यांत असे का खेळले नाही, हा प्रश्न चाहत्यांना भेडसावत होता. रोहित-लोकेश जोडीनं पहिल्या विकेटसाठी १४० धावा जोडीन २००७ सालचा विक्रम मोडला. रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांनी प्रमोशन मिळाल्याचा आनंदही दणक्यात साजरा केला आणि भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. चार वर्षांनंतर आर अश्विनचे झालेले पुनरागमन हे भारतासाठी महत्त्वाचे ठरले आणि त्यानंही कमाल केली. भारतानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ मधील पहिल्या विजयाची नोंद करताना उपांत्य फेरीच्या अंधुकशा आशा जीवंत राखल्या आहेत.
रोहित शर्मा व लोकेश राहुल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध २ बाद २१० धावांचा डोंगर उभा केला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये २००+ धावा करणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. रोहित ४७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकार खेचून ७४ धावांवर माघारी परतला. लोकेश ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा करून माघारी परतला. यानंतर हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनीही वाहत्या गंगेत हात धुतले. रिषभ पंतनं १३ चेंडूंत २७ ( १ चौकार व ३ षटकार) धावा केल्या, तर हार्दिक पांड्यानं १३ चेंडूंत ३५ ( ४ चौकार व २ षटकार) धावा करताना टीम इंडियाला २ बाद २१० धावांचा पल्ला गाठून दिला
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानला मोहम्मद शमीनं पहिला धक्का दिला. मोहम्मद शाहजाद ( ०) तिसऱ्या षटकात बाद झाला. पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहनं अफगाणिस्तानची दुसरी विकेट काढली. हझरतुल्लाह झजाई १३ धावा करून बाद झाला. रहमतुल्लाह गुरबाज व गुलबदीन नैब यांनी काही उत्तुंग फटके मारून अफगाणिस्तानच्या चाहत्यांना खूश केलं. रवींद्र जडेजानं ही जोडी तोडली व गुरबाज १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर आर अश्विननं अफगाणिस्तानच्या नैब ( १८) व नजिबुल्लाह झाद्रान ( ११) यांची विकेट काढली. अश्विननं पाच वर्षांनंतर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये विकेट घेतली.
मोहम्मद नबी आणि करिम जनत यांनी चांगला खेळ केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मोहम्मद शमीनं १९व्या षटकात नबीला ३५ धावांवर बाद केले. सर रवींद्र जडेजानं अफलातून झेल टिपला. त्याच षटकात राशिद खानही भोपळ्यावर माघारी परतला. अफगाणिस्तानला ७ बाद १४४ धावा करता आल्या आणि भारतानं ६६ धावांनी हा सामना जिंकला. मोहम्मद शमीनं ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs Afg Live updates : India opens their account with a magnificent win over Afghanistan. India won by 66 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.