ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan Scoreacard Live updates : तहान लागल्याशिवाय विहीर खणायची नाही, असंच काहीसं टीम इंडियाच्या बाबतीत झालं आहे. पाणी नाकापर्यंत आल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आता हातपाय मारताना दिसत आहेत. पाकिस्तान व न्यूझीलंड याच्याकडून दारूण पराभव पत्करणाऱ्या टीम इंडियानं आज अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. रोहित शर्माला ( Rohit Sharma) पुन्हा ओपनिंगला त्याच्या जून्याच स्टाईलमध्ये पाहून चाहते सुखावले. लोकेश राहुलनंही ( KL Rahul) त्याला चांगली साथ देताना पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या सामन्यात रोहितचा झेल टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) टिपला.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याच्या भारताच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या असल्या तरी चाहत्यांना अजूनही भाबडी आस आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आजच्या सामन्यात हार्दिक पांड्याला पुन्हा संधी दिली गेली, तर इशान किशनच्या जागी सूर्यकुमार यादवचे पुनरागमन झालं आणि वरुण चक्रवर्थी दुखापतग्रस्त झाल्यानं आर अश्विनची ४ वर्षांनंतर ट्वेंटी-२० संघात एन्ट्री झाली. रोहित व लोकेश या जोडीला सलामीला पाहून भारतीय चाहते सुखावले.
रोहित व लोकेश यांनी आज निराश नाही केलं. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ५३ धावा कुटल्या. रोहितनं ५व्या षटकात नवीन उल हकच्या गोलंदाजीवर १७ धावा चोपल्या. पाचव्या चेंडूवर रोहितनं स्ट्रेट षटकार खेचला अन् तो टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये गेला. ग्लोज, हॅल्मेट, पॅड घालून डगआऊटमध्ये बसलेल्या विराटच्या हातात तो चेंडू गेला.