ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand Scoreacard Live updates : भारतीय संघाला आज पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. २००३ पासून टीम इंडियाला आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवता आलेला नाही आणि आजही तेच घडले. भारताला ७ बाद ११० धावाच करता आल्या आणि न्यूझीलंडनं हे लक्ष्य सहज पार केलं. ''फलंदाजी किंवा गोलंदाजी आम्ही काहीच खास करू शकलो नाही. बचाव करता येतील इतक्याही धावा आम्ही करू शकलो नाही, परंतु मैदानावर येतानाच आम्ही लढाऊबाणा हरवलेला होता,''असे सांगून कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) टीम इंडियाच्या पराभवाची कारणं सांगितली.
न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियानं इशान किशन व लोकेश राहुल या जोडीचा प्रयोग केला, परंतु तो फसला. रोहित शर्माला जीवदान मिळूनही काही खास करता आले नाही. कर्णधार विराट कोहली व रिषभ पंत यांनी दडपणात विकेट फेकल्या. हार्दिक पांड्या २३ व रवींद्र जडेजा नाबाद २६ धावा करून संघाला ७ बाद ११० धावांपर्यंत मजल मारून दिली. ट्रेंट बोल्ट ( ३-२०), इश सोढी ( २-१७) यांच्यासह टीम साऊदी ( १-२६), अॅडम मिल्ने ( १-३०) यांनीही चांगली गोलंदाजी केली. न्यूझीलंडनं डॅरील मिचेलनं ४९ धावा करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. केन विलियम्सन ३३ धावांवर नाबाद राहिला आणि मार्टीन गुप्तील २० धावांवर बाद झाला. भारतासाठी दोन्ही विकेट्स जसप्रीत बुमराहनं घेतल्या.
विराट कोहली काय म्हणाला?''फलंदाजी किंवा गोलंदाजी आम्ही काहीच खास करू शकलो नाही. बचाव करता येतील इतक्याही धावा आम्ही करू शकलो नाही, परंतु मैदानावर येतानाच आम्ही लढाऊबाणा हरवलेला होता. भारतीय संघाकडून खेळताना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असता आणि त्या फक्त फॅन्सकडून नाहीत, तर खेळाडूंकडूनही असतात. त्यामुळेच प्रत्येक लढतीत आमच्यावर अधिक दडपण असतेच आणि वर्षानुवर्षे त्यासोबत आम्ही खेळतोय. या दोन सामन्यांत आमची कामगिरी खराब झाली. अजूनही बरंच क्रिकेट खेळणं बाकी आहे,'' असे विराट सामन्यानंतर म्हणाला.