दुबई - आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठली असून, संघनिवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आता येत्या रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी भारतीय संघामध्ये तीन बदल होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार यांना भारतीय संघात दिल्या गेलेल्या स्थानावर आणि आर. अश्विनला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. गेल्या काही काळापासून गोलंदाजी करत नसलेल्या हार्दिक पांड्याला फलंदाज म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले होते. तर भुवनेश्वर कुमारला गेल्या काही काळापासून गोलंदाजीची लय सापडलेली नाही. आयपीएलमध्येही तो फ्लॉप झाला होता.
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारताला आता न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक बनले आहे. न्यूझीलंडविरुद्धची किरकोळ चूकही भारतीय संघाला महागात पडू शकते. भारतीय संघाची रचना ही पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतील पराभवाचे मोठे कारण ठरले होते. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघात तीन बदल होऊ शकतात. यामध्ये हार्दिक पांड्याच्या जागी ईशान किशन याला संघात स्थान दिले जाऊ शकते. तर अनुभवी आर. अश्विन याला वरुण चक्रवर्तीच्या जागी संघात स्थान दिले जाऊ शकते. तर भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरची निवड करण्यात येण्याची शक्यता आहे.
भुवनेश्वर कुमारला आयपीएल २०२१ मध्ये लक्षवेधी कामगिरी करता आलेली नाही. ११ सामन्यात त्याला केवळ ६ बळी मिळवता आले होते. पाकिस्तानविरुद्धही त्याची गोलंदाजी फारशी प्रभावी ठरली नव्हती. अशा परिस्थितीत त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान मिळू शकते. गेल्या दोन वर्षांत १४ डावांत त्याने २३ विकेट घेतल्या आहेत. तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती हा निष्प्रभ ठरला होता. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी त्यांची धुलाई केली होती. त्यामुळे त्याच्या जागी अनुभवी रविचंद्र अश्विनला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.