मुंबई - आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचे तीव्र पडसाद भारतात उमटत आहेत. अनेक जणांकडून भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. तर काही ठिकाणी पाकिस्तानच्या विजयानंतर आनंद व्यक्त केल्याच्या तसेच फटाके फोडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. काश्मीर, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यासाठी यूएपीए कायद्याचा उपयोग केला गेला. दरम्यान, या कारवाईवरून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नितीन राऊत यांनी खोचक टीका केली आहे. (ICC T20 World Cup 2021 Updates)
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीने पाकिस्तानी खेळाडूंचं कौतुक केलं होतं. त्यावरून नितीन राऊत यांनी हा टोला लगावला आहे. पाकिस्तानी खेळाडूंचं कौतुक करणाऱ्या विराट कोहलीलाही आता यूएपीए कायद्यांतर्गत अटक करणार का असा प्रश्न त्यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून केंद्र आणि भाजपाशासित राज्यांच्या सरकारांना विचारला आहे. दरम्यान, नितीन राऊत यांच्या या पोस्टखाली नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
टी-२० विश्वचषकातील सलामीच्या लढतीत पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर पंजाबमधील एका वसतीगृहात काही काश्मिरी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली होती. पाकिस्तानच्या विजयानंतर व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून आनंद व्यक्त करणाऱ्या एका शिक्षिकेला निलंबित करण्याची आल्याची घटना राजस्थानमध्ये घडली होती. जम्मू काश्मीरमध्येही पाकिस्तानचा विजय झाल्यानंतर आनंद व्यक्त केल्याने अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.