T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडनं द.आफ्रिकेविरुद्धचा साखळी फेरीतील अखेरचा सामना १० धावांनी गमावला. पण गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखत इंग्लंडनं मोठ्या दिमाखात स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेनं सामना जिंकून ८ गुणांसह इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली खरी पण संघाला उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. कारण नेट रनरेटच्या जोरावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानं आघाडी घेत उपांत्य फेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेनं साखळी फेरीतील अखेरचा सामना मात्र दिमाखात जिंकून आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. आफ्रिकेच्या याच खेळीचं कौतुक करण्यासाठी सामना संपल्यानंतर मैदानात दाखल झालेल्या दुखापतग्रस्त जेसन रॉयनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. जेसन रॉयनं मोठ्या मनानं पायाला दुखापत असूनही द.आफ्रिकेच्या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांनी केलेल्या खेळीचं कौतुक केलं.
जेसन रॉयनं केलेल्या कृतीचं सोशल मीडियात जोरदार कौतुक केलं जात आहे. द.आफ्रिकेनं दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडची सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर मैदानात उतरले होते. दोघांनी चांगली सुरुवात देखील केली होती. पण सामन्याच्या सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेत असताना जेसन रॉयच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. दुखापत इतकी गंभीर होती की जेसन रॉयला उभं देखील राहता येत नव्हतं. तो मैदानातच कोसळला होता आणि त्याच्या डोळ्यांतून येणारे अश्रू दुखापतीचं गांभीर्य व्यक्त करत होते. दुखापत गंभीर असल्यानं जेसन रॉयला सामना अर्धवट सोडून तंबूत परतावं लागलं. पण सामना संपल्यानंतर जेसन रॉय ड्रेसिंग रुममधून तसाच लंगडत बाहेर आला आणि द.आफ्रिकेच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. जेसन रॉयला पाहून द.आफ्रिकेच्या खेळाडूंनाही खूप बरं वाटलं आणि त्यांनीही रॉयला मिठी मारुन त्याचे आभार व्यक्त केले.
जेसन रॉय याला दुखापती झाली तो क्षण: