अबु धाबी - आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये उपांत्य फेरीत खेळणारा चौथा संघ कोण असेल याचा निर्णय अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात आज होणाऱ्या सामन्यामधून होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत. तसेच या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय व्हावा, यासाठी प्रार्थना केली जात आहे. यादरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी अफगाणिस्तानच्या त्या गोलंदाजाचा उल्लेख केला आहे जो आज होणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात निर्णायक भूमिका बजावू शकतो. हा गोलंदाज आहे मुजीब उर रहमान. गेल्या दोन सामन्यात त्याची उणीव अफगाणिस्तानला प्रकर्षाने जाणवली होती. त्यामुळेच आजच्या सामन्यात त्याचा संघात समावेश करण्याचा सल्ला गावस्कर यांनी दिला आहे.
सुनील गावस्कर म्हणाले की, मुजीब न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानसाठी ट्रंपकार्ड ठरू शकतो. कारण वरुण चक्रवर्तीप्रमाणेच त्याची गोलंदाजी खेळणे कठीण आहे. तसेच मुजीबकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे रशिद खानसोबत मिळून किवी फलंदाजांना त्रस्त करू शकतो.
मुजिबने या विश्वचषकात आतापर्यंत केवळ दोन सामने खेळले आहेत. त्यात त्याने फिरकी गोलंदाजीच्या जोरावर विरोधी फलंदाजांची दाणादाण उडवली आहे. त्याने दोन सामन्यात ५.६६च्या सरासरीने ६ विकेट्स मिळवले आहेत. त्यामध्ये स्कॉटलंडविरुद्ध घेतलेल्या ५ बळींचास समावेश आहे. टी-२० विश्वचषकात मुजिबने प्रत्येक ८ चेंडूंमागे एक बळी टिपला आहे. मात्र नंतरच्या सामन्यात दुखापतीमुळे त्याला पाकिस्तान आणि भारताविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते. त्या दोन्ही सामन्यांत अफगाणिस्तानचा पराभव झाला होता.
मुजिबचा संघात समावेश झाल्याने अफगाणिस्तानची गोलंदाजी मजबूत होईल. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी तो फिट व्हावा, एवढीच माझी अपेक्षा आहे. आता जर मुजिब आजचा सामना खेळला तर रशिद, मोहम्मद नबी आणि मुजिब अशा फिरकी त्रिकुटाचा सामना करणे न्यूझीलंडला कठीण जाऊ शकते.