मुंबई - आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये पहिल्या दोन सामन्यात पराभूत झालेल्या भारतीय संघाने नंतरच्या दोन सामन्यात दणदणीत विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले आहे. मात्र भारतीय संघाचे भवितव्य आता अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात न्यूझीलंड जिंकल्यास भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. तर अफगाणिस्तानचा विजय झाल्यास भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी असेल. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील लढतीत कुणाचं पारडं जड राहू शकतं, याचा घेतलेला हा आढावा.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केल्यास अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांविरुद्ध एकही सामना खेळलेले नाहीत. दोन्ही संघ त्यांच्यातील पहिलावहिला टी-२० सामना ७ नोव्हेंबर रोजी आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये खेळणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कुणाचं पारडं जड असेल, याचं भाकीत आताच करणे अवघड ठरणार आहे. मात्र कागदावर तरी न्यूझीलंडचा संघ हा अफगाणिस्तानपेक्षा कांकणभर सरस आहे. तसेच दोन्ही संघ याआधी दोन एकदिवसीय सामन्यात आमनेसामने आले असून, त्यात न्यूझीलंडने बाजी मारलेली आहे.
मात्र असे असले तरी अफगाणिस्तानच्या संघाला कमी लेखून चालणारे नाही. अफगाणिस्तानच्या संघाला अबूधाबीमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. येथे अफणागिस्तानने १२ टी-२० सामने खेळले असून, त्यातील ९ सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. तर केवळ तीन सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. मात्र येथे खेळलेल्या एकमेव टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाला आहे. एकंदरीत भारतासह संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केल्यास तो टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील ऐतिहासिक विजय ठरणार आहे.
भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा संघ जिंकल्यास त्यांचे आठ गुण होतील आणि ते थेट उपांत्य फेरीत पोहोचतील. मात्र अफगाणिस्तानचा संघ जिंकल्यास भारतासाठीही उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल. मात्र अपेक्षित धावगती राखण्यात भारताला अपयश आल्यास अफगाणिस्तानलाही उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल.