ICC T20 World Cup 2021 Afghanistan vs Pakistan Scoreacard Live updates : अफगाणिस्तानच्या ६ बाद १४७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात साजेशी झाली नाही. मोहम्मद रिझवाद ८ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आजम आणि फाखर जमान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. मुजीब उर रहमाननं अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. १२ धावांवर पहिली विकेट पडूनही बाबर ( Babar Azam) खेळपट्टीवर अडून बसला. त्यानं या सामन्यात दमदार खेळी करताना वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. बाबरनं आजच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा मोठा विक्रम मोडला.
अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझरतुल्लाह झझाई व मोहम्मद शाहजाद फलंदाजीला मैदानावर उतरले अन् शाहिन आफ्रिदी गोलंदाजीवर होता. शाहिननं पहिल्याच षटकात DRS वाया घालवला. पण, हझरतुल्लाह झझाई ( ०) व मोहम्मद शाबजाज ( ८) यांना अुक्रमने इमाद वासीम व शाहिन यांनी बाद केले. त्यानंतर टप्प्याटप्पानं अफगाणिस्तानच्या विकेट्स पडतच होत्या. पण, त्यांचा प्रत्येक फलंदाज आक्रमक पवित्र्यातच होता. रहमनुल्लाह गुर्बाज ( १०) व अस्घर अफघान ( १०) हेही आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसले. करीन जनत ( १५) हा बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानची अवस्था ५ बाद ६४ अशी झाली.
नजिबुल्लाह झाद्रान व कर्णधार मोहम्मद नबी यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु २२ धावांवर झाद्रान बाद झाला. आता सामना आपल्या हातात असेच पाकिस्तानला वाटत होते, परंतु नबी व गुलबदीन नैब या जोडीनं पाकिस्तानी गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना अफगाणिस्तानला सन्मानजक धावसंख्या उभी करून दिली. इमाद वासीमनं २५ धावांत २ विकेट्स घेतल्या. हसन अलीनं टाकलेल्या १८व्या षटकात गुलबदीननं २१ धावा कुटल्या. नबी ३५ आणि नैब ३५ धावांवर नाबाद राहिले. या जोडीनं अखेरच्या पाच षटकांत धावांचा पाऊस पाडला आणि संघाला ६ बाद १४७ धावा उभ्या करून दिल्या.