ICC T20 World Cup 2021 Pakistan Vs New Zealand Scoreacard Live updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज टीम इंडिया मैदानावर उतरली नसली तरी समर्थक पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत. आजच्या सामन्यात पाकिस्तान जिंकावा, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडताना न्यूझीलंडला कमी धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. हॅरिस रौफनं चार विकेट्स घेत किवींची दाणादाण उडवली
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) यानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. शाहजाच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांचा कस लागणार हे निश्चित होते. त्यामुळेच मार्टिन गुप्तील व डॅरील मिचेल या जोडीनं सावध खेळ केला. पाकिस्तानी गोलंदाजांनीही टिच्चून मारा करताना किवींच्या धावांचा ओघ रोखला होता. या जोडीला ५.२ षटकांत ३६ धावाच करता आल्या होत्या. हॅरीस रौफच्या गोलंदाजीवर गुप्तील दुर्दैवीरित्या बाद झाला. रौफनं टाकलेला चेंडू गुप्तीलच्या पॅडला लागून स्टम्प्सवर आदळला. त्यानंतर मिचेल व कर्णधार केन विलियम्सन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु मिचेल ( २७) इमाद वासिमच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
जिमी निशॅम पहिल्याच चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात मोहम्मद हाफिजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विलियम्सन व डेव्हॉन कॉनवे यांनी संयमी खेळ करताना किवींना आशेचा किरण दाखवला. पण, केनला एक धाव घेण्याचा मोह महागात पडला. गोलंदाज हसन अलीनं डायरेक्ट हिट करून केनला धावबाद केले. आपण चुकलो, हा भाव केनच्या चेहऱ्यावर प्रकर्षानं दिसला. तो २५ धावांवर धावबाद झाला. किवींनी १५व्या षटकात १०० धावांचा पल्ला पार केला. पाकिस्तानी गोलंदाजांनी आजही उल्लेखनीय कामगिरी केली.
कॉनवे अखेरच्या षटकांत फटकेबाजी करून किवींना समाधानकारक पल्ला गाठून देईल, अशी अपेक्षा होती. पण, रौफच्या गोलंदाजीवर लाँग ऑनवरून टोलावलेला चेंडू डिप मिड विकेटला बाबर आजनं झेलला आणि कॉनवे २७ धावांवर बाद झाला. त्याच षटकात किवींचा दुसरा सेट फलंदाज ग्लेन फिलिप्स ( १३) बाद झाला. शाहिन शाह आफ्रिदी ( १-२१), इमाद वासीम ( १- २४) आणि मोहम्मद हाफिज ( १-१६) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रौफनं २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडला ८ बाद १३४ धावा करता आल्या.