दुबई - आयसीसी टी-२० विश्वचषकातील भारतीय संघाचे अभियान सुपर १२ फेरीतच संपुष्टात आले आहे. त्याबरोबरच प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्यकाळाचाही शेवट झाला आहे. दरम्यान, नामिबियाविरुद्धचा सामना जिंकून भारतीय संघाने रवी शास्त्री यांना विजयी निरोप दिला. या सामन्यानंतर रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रुममध्ये निरोपाचे भाषण केले. त्यावेळी शास्त्रींनी हा संघ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम संघांपैकी एक असल्याचे नमूद केले. तसेच आम्ही एक-दोन आयसीसी स्पर्धा जिंकू शकलो असतो मात्र तसेच झाले नाही, अशी खंतरी शास्त्री यांनी व्यक्त केली.
आपल्या निरोपाच्या भाषणात रवी शास्त्री म्हणाले की, एक संघ म्हणून आम्ही अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवले. गेल्या पाच वर्षांत आम्ही संपूर्ण जगात जाऊन क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात विरोधी संघांना पराभूत केले. क्रिकेटच्या इहिहासातील उत्तम संघ म्हणून या संघाची गणना होईल. कारण आमचा रिझल्ट समोर आहे.
आमच्यासाठी ही स्पर्धा चांगली राहिली नाही. आम्ही एक दोन आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो असतो. मात्र असे झाले नाही. पण हाच खेळ आहे. तुम्हाला पुन्हा संधी मिळेल. आता अनुभवासोबत पुढे जाऊ, जीवनात केवळ तोच सर्वकाही नाही आहे. जे तुम्ही मिळवले आहे. तुम्ही कुठून आला आहात, यालाही महत्त्व असते.
आपल्या शेवटच्या भाषणात रवी शास्त्री म्हणाले की, या संघाने प्रत्येक आव्हान स्वीकारले. हेच या संघाचे वैशिष्ट्य आहे. भाषण संपल्यानंतर शास्त्रींनी सर्व खेळाडूंशी संवाद साधला. त्यांची गळाभेट घेतली. रवी शास्त्रींसोबतच भरत अरुण आणि आर. श्रीधर यांचाही भारतीय संघासोबतचा कार्यकाळ संपला आहे. रवी शास्त्री सुमारे पाच वर्षे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. २०१७ मध्ये ते प्रशिक्षक म्हणून रुजू झाले होते. तत्पूर्वी त्यांनी भारतीय संघाचे संचालक म्हणूनही काम पाहिले होते. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय संघ जगातील सर्वोत्तम कसोटी संघ म्हणून नावारूपास आला होता.