Join us  

T20 World Cup 2021 SL vs BAN Live Score: शाकिब अल हसनचा विश्वविक्रम, पण लिटन दासच्या चुकीमुळे जिंकली श्रीलंका!

ICC T20 World Cup 2021 Sri Lanka vs Bangladesh Scoreacard Live updates: बांगलादेशच्या नईम ( Mohammad Naim) व मुस्फीकर रहिम ( Mushfiqur Rahim) यांनी दमदार टोलेबाजी करताना श्रीलंकेसमोर तगडं आव्हान उभं केलं. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 7:19 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 Sri Lanka vs Bangladesh Scoreacard Live updates: बांगलादेशच्या नईम ( Mohammad Naim) व मुस्फीकर रहिम ( Mushfiqur Rahim) यांनी दमदार टोलेबाजी करताना श्रीलंकेसमोर तगडं आव्हान उभं केलं. पण, लिटन दासनं सोडलेले झेल बांगलादेशला महागात पडले अन् श्रीलंकेनं हा सामना जिंकला. चरिथ असलंका ( Charith Asalanka) आणि भानुका राजपक्ष ( Bhanuka Rajapaksa) यांनी दमदार फलंदाजी केली. श्रीलंकेनं हा सामना ५ विकेट्स व ७ चेंडू राखून जिंकला. 

श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु शारजाहच्या खेळपट्टीवर बांगलादेशच्या फलंदाजांनी वादळ आणलं. लिटन दास व मोहम्मद नईम यांनी सुरेख कामगिरी बजावताना संघाला पॉवरप्लेमध्ये ८च्या सरासरीनं धावा चोपून दिल्या. ६ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही भागीदारी संपुष्टात आली. नईमनं ५२ चेंडूंत ६२ धावा केल्या आणि लिटन १६ धावांवर माघारी परतला. शाकिब अल हसनही ( १०) अपयशी ठरला. 

मुश्फीकुर रहिम दमदार फटकेबाजी केली. रहिमनं ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. कुमारानं ३० धावांत १, बिनुरा फर्नांडोनं २७ धावांत १, चमिका करुणारत्नेनं १२ धावांत १ विकेट घेतली. रहिम ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांवर नाबाद राहिला, तर महमुदुल्लाहनं नाबाद १० धावा केल्या. बांगलादेशनं ४ बाद १७१ धावांचा डोंगर उभा केला. 

प्रत्युत्तरात कुसल परेरा ( १) लगेच माघारी परतूनही पथून निसंका आणि चरिथ असालंका यांनी ६९ धावांची भागीदारी करताना श्रीलंकेचा डाव सावरला. ही सेट जोडी तोडण्यासाठी बांगलादेशनं संघातील सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनला पाचारण केलं आणि त्यानं पहिल्याच षटकात दोन धक्के दिले. निसंका ( २४) आणि अविष्का फर्नांडो ( ०) माघारी परतल्यानं श्रीलंका बॅकफूटवर गेली. त्यात मोहम्द सैफुद्दीननं श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाची ( ६) विकेट घेतली. श्रीलंकेनं ८ धावांत तीन फलंदाज गमावले.

  • शाकिब अल हसन बनला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज - शाकिब च्या नावावर आता ४१ विकेट्स झाल्या आहेत. शाहिद आफ्रिदीचा ३९ विकेट्सचा विक्रम त्यानं मोडला.  
  • सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १०+ विकेट्स घेणारा शाकिब अल हसन हा पहिलाच गैरपाकिस्तानी गोलंदाज ठरला. यापूर्वी शाहिद आफ्रिदी ( २००७, २००९), उमर गुल ( २००७ व २००९) आणि सईद अजमल ( २००९ व २०१०) या पाकिस्तानी गोलंदाजांनी हा पराक्रम केला होता.  

 

१३व्या षटकात लिटन दासनं श्रीलंकन फलंदाज भानुका राजपक्षचा झेल सोडला. असलंकानं ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. १५व्या षटकात लिटन दासनं आणखी एक चूक केली आणि सेट फलंदाज असलंकाचा झेल सोडला. हे दोन झेलच बांगलादेशला महागात पडले. मोहम्मद सैफुद्दीननं टाकलेल्या १६व्या षटकात या दोघांनी २२ धावा कुटल्या. राजपक्षनं दोन षटकार व दोन चौकार मारले. त्यामुळे श्रीलंकेला आता २४ चेंडूंत २४ धावाच करायच्या होत्या. शाकिबच्या षटकात ११ धावा चोपून श्रीलंकेनं सामना एकतर्फी केला. असलंका ४९ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला. राजपक्षनं ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा चोपल्या. श्रीलंकेनं १८.५ षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१श्रीलंकाबांगलादेश
Open in App