ICC T20 World Cup 2021, West Indies vs Australia, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज अबूधाबीच्या मैदानात सुरू असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात वेस्ट इंडिजनं १५८ धावांचं आव्हान कांगारुंसमोर ठेवलं आहे. वेस्ट इंडिजला पराभूत करुन स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठीची दावेदारी सिद्ध करण्याची संधी ऑस्ट्रेलियाला असणार आहे. तर वेस्ट इंडिजचा आजचा सामना गमावला तर आयसीसी क्रमवारीत संघ नवव्या स्थानी घसरणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडिजच्या संघावर क्वालिफिकेशन राऊंड खेळण्याची नामुष्की ओढावणार आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो आज वेस्ट इंडिजकडून शेवटचा ट्वेन्टी-२० सामना खेळत आहे. त्यानं निवृत्तीची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियानं आजच्या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजला २० षटकांच्या अखेरीस ७ बाद १५७ धावा करता आल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून कर्णधार कायरन पोलार्डनं सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर एवन लुईसनं २९ धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियानकडून जोश हेजलवूडनं अचूक मारा करत वेस्ट इंडिजच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि अॅडम झॅम्पा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली होती. पहिल्या षटकात ४ धावा आल्या होत्या. पण दुसऱ्या षटकात २० धावा कुटल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजनं आता आक्रमक पवित्रा धारण केलाय असं दिसू लागलं असतानाच पुढच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात ख्रिस गेल बाद झाला. त्यानंतर चौथ्या षटकात वेस्ट इंडिजला लागोपाठ दोन धक्के बसले. निकोलस पुरन आणि रोस्टन चेज स्वस्तात माघारी परतले. शिमरन हेटमायर (२७) आणि कर्णधार पोलार्डनं (४४) संघाचा डाव सावरला. अखेरच्या षटकांमध्ये आंद्र रसेलनं ७ चेंडूत नाबाद १८ धावांची खेळी साकारुन संघाला १५० टप्पा ओलांडून दिला.