ICC T20 World Cup Shifted : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI) सचिव जय शाह यांनी यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारतात होणार नसल्याची घोषणा सोमवारी केली. ''ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे होणार असून स्पर्धेची तारखा आयसीसी जाहीर करतील,''अशी माहिती जय शाह यांनी ANI शी बोलताना दिली. बीसीसीआयनं या स्पर्धा आयोजनाचे हक्क स्वतःकडे राखले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही PTI शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना, पाहा Photo
देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींच्या घरात गेली आहे. २०२०-२१ मध्ये देशातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती, परंतु एप्रिल व मे या महिन्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं. एका दिवसाला ४ लाख रुग्णांची भर पडल्याचे आकडेवारी सांगते. आयपीएल २०२१साठी बीसीसीआयनं तयार केलेलं सुरक्षित बायो बबलमध्येही कोरोनानं शिरकाव केला अन् एकामागून एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे स्पर्धा स्थगित करावी लागली. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
''वर्ल्ड कप स्पर्धेबाबत निर्णय आयसीसीला कळवण्याचा आज अंतिम दिवस होता. त्यामुळे बीसीसीआय अधिकाऱ्यांसोबत आज कॉन्फरन्स कॉल झाला. २-३ महिन्यात काय घडेल, याबाबत कोणीच खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे ही सर्व परिस्थिती लक्षात घेता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यूएईत खेळवण्याचा निर्णय घेतल्याचे आम्ही आयसीसीला कळवणार आहोत. भारतानंतर या स्पर्धेसाठी हेच योग्य ठिकाण आहे. भारतातच या स्पर्धेचं आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न होता. आयपीएलनंतर लगेचच ही स्पर्धा सुरू होईल. पात्रता फेरीचे सामने ओमान येथे होतील आणि उर्वरित सामने दुबई, अबु धाबी व शाहजाह येथे होतील,''असे बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला ( BCCI Vice-President Rajeev Shukla ) यांनी सांगितले.