मेलबर्न - ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकाचे बिगुल वाजले असून, गटसाखळीतील पहिल्या सामन्यात श्रीलंका आणि नामिबियाचे संघ आमने सामने आले आहेत. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून नामिबियाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर नवख्या नामिबियाच्या संघाने सुरुवातीच्या पडझडीतून सावरत श्रीलंकेसमोर १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
प्रथम फलंदाजी करताना नामिबियाच्या संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांचे व्हॅन लिंगेन (३) आणि ला कूक (९) दोन्ही सलामीवीर १६ धावांमध्येच माघारी परतले. त्यानंतर इटोन (२०), इरास्मस (२०), ब्राड (२६) आणि वाईस (०) हे ठराविक अंतराने बाद होत गेल्याने नामिबियाची अवस्था ६ बाद ९३ अशी झाली होती.
मात्र अखेरच्या ३४ चेंडूत फ्रायलिंक आणि जेजे स्मित यांनी ७० धावांची तुफानी भागीदारी करत नामिबियाच्या संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. फ्रायलिंकने २८ चेंडूत ४४ तर जेजे स्मित याने १६ चेंडूत नाबाद ३१ धावा कुटत श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. फ्रायलिंक डावातील शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. दरम्यान, श्रीलंकेकडून मदुशान याने दोन, तर तीक्षणा, चमीरा, करुणारत्ने आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.