न्यूयॉर्क - पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीनशाह आफ्रिदी यांच्यात मतभेद असून दोघे एकमेकांशी बोलत नाहीत, हे वृत्त संघाचे सहायक कोच अझहर मेहमूद यांनी फेटाळले. मेहमूदनी वसीम अक्रम यांचा दावा चुकीचा असल्याचे सांगितले. खेळाडूंना क्रिकेटशिवाय बाहेरचे जग असू नये, भारताविरुद्धच्या पराभवाचे मंथन हॉटेलमधील चार भिंतीआड करावे, असा विचार बाळगणाऱ्यांवर मेहमूदनी नेम साधला. पाकिस्तान संघात दोन गट पडल्याची चर्चा आहे. एका गटाचे नेतृत्व कर्णधार बाबर तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व शाहीन करतो. पाक संघ भारताचे १२० धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला होता. या पराभवाचा उल्लेख करीत मेहमूद म्हणाले, ‘वसीम असे म्हणाला असेल मात्र मला माहिती नाही. शाहीन आणि बाबर हे एकमेकांशी संवाद साधतात. दोघे चांगले मित्र आणि पाक संघातील महत्त्वाचे खेळाडू आहेत. आम्ही कुणाच्या चुकीमुळे नव्हे तर सांघिक चुकीमुळे सामना गमावला.’
माध्यमांशी संंवाद साधण्यासाठी खेळाडू पत्रकार परिषदेत का येत नाहीत? असा सवाल करताच मेहमूद म्हणाले, ‘पराभवाची जबाबदारी घेण्याचा संदर्भ असेल तर सहयोगी स्टाफदेखील समान जबाबदार आहे. आम्ही कोणत्याही खेळाडूला लपविलेले नाही. प्रत्येकजण सोबत आहे. सांघिकरीत्या आणि पराभव स्वीकारला आणि पुढच्या सामन्याची तयारी सुरू केली आहे.
आमचा संघ कामगिरी करीत नाही म्हणूनच मी येथे बसलेलो आहे. काल गॅरी कर्स्टन तुमच्यापुढे आले होते. कोणत्याही खेळाडूला पाठविण्यापेक्षा मुख्य कोच माध्यमांशी बोलले, हे बरे नव्हते का? ते आमच्या संघाचा भाग आहेत.’
मुख्य निवडकर्ते वहाब रियाज आणि कर्णधार बाबरसोबत मेहमूद यांनी रात्र भोजन घेतले. यामुळे चाहत्यांमधील नाराजी आणखी वाढली. पाकच्या एका पत्रकाराने याविषयी प्रश्न विचारताच मेहमूद पुढे म्हणाले, ‘तुम्ही सर्वजण तेथे होता. आम्ही भावुक होतो, एक सामना गमावताच आयुष्य संपले असे नव्हे. शांतचित्ताने पुढे जाण्याची गरज आहे. आमच्या खेळाडूंना मानसिक बळ देण्याची गरज असून मी तेच करतो आहे.’