कॅरेबियन देशांमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियासाठी ही विश्वचषक स्पर्धा जवळपास मागच्या विश्वचषकासारखीच चालली असून, आता उपांत्य फेरीतही भारतीय संघाची गाठ मागच्या वेळेप्रमाणे इंग्लंडशी पडणार आहे. गेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यावेळी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघ मागच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढेल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना वाटत आहे.
मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय संघ हा आयसीसीच्या एकाही स्पर्धेचं विजेतेपद मिळवू शकलेला नाही. २०१३ मध्ये जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनेक स्पर्धांमध्ये उपांत्य आणि अंतिम फेरीपर्यंत मजल मारूनही भारतीय संघाला विजेतेपरदावर कब्जा करता आलेला नाही. गतवर्षी भारतात झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे भारतीय संघाचा आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील विजेतेपदाचा दुष्काळ कधी संपणार, याची वाट क्रिकेटप्रेमींकडून पाहिली जात आहे.
२०२२ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने आपल्या गटातून अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तसेच उपांत्य फेरीत भारतीय संघाची गाठ दुसऱ्या गटात दुसरे स्थान पटकावणाऱ्या इंग्लंडशी पडली होती. त्या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा १० गडी राखून फडशा पाडला होता. यावेळीही भारतीय संघाने सुपर ८ मध्ये अव्वलस्थान पटकावत उपांत्य फेरी गाठली आहे. तर दुसऱ्या गटात दुसऱ्या स्थानी राहत इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आणखी योगायोग म्हणजे मागच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि इंग्लंडचे संघ हे दुसऱ्या उपांत्य सामन्यात आमने सामने आले होते. यावेळीही दोन्ही संघ दुसऱ्या उपांत्य सामन्यात आमने सामने येणार आहेत. त्यामुळे आता गुरुवारी होणाऱ्या सामन्याता भारतीय संघ इंग्लंडवर मात करून मागच्या पराभवाचा वचपा काढेल, अशी क्रिकेटप्रेमींना आशा आहे.
मागच्या टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. त्या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी गमावून १६८ धावा काढल्या होत्या. मात्र इंग्लंडने एकही गडी न गमावता या आव्हानाचा फडशा पाडला होता. भारतीय संघानं २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकावर कब्जा केला होता. तर २०१४ मध्ये उपविजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर भारतीय संघाला एकदाही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आलेली नाही.