आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये गुयाना येथे खेळला जाणार आहे. तत्पूर्वी पहिल्या उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर आरामात विजय मिळवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या उपांत्य सामन्यात पावसाची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या नजरा ह्या गुयानातील मैदानासोबतच आकाशाकडेही राहणार आहेत. अशा परिस्थितीत मागच्या २४ तासांमध्ये गयानातील हवामान कसं होतं आणि सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कितपत आहे याचा घेतलेला हा आढावा.
भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये गयाना येथे खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र मागच्या २४ तासांपासून येथे पाऊस पडलेला नाही. आज सकाळी येथे ऊन पडले होते. तसेच आकाशही स्वच्छ होते. त्यामुळे या संकेतांमुळे संपूर्ण सामना पाहण्यास उत्सुक असलेल्या क्रिकेटप्रेमींमध्ये सामन्याबाबत उत्साह दिसून येत आहे.
आज होत असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस पडून सामना रद्द झाल्यास गुणतक्त्यातील सरस कामगिरीमुळे भारतीय संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल तर इंग्लंडला स्पर्धेबाहेर व्हावं लागेल. दरम्यान, २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्येही भारत आणि इंग्लंडचे संघ आमनमेसामने आले होते. त्यावेळी इंग्लंडने भारताचा १० विकेट्स राखून पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाने त्या पराभवाचा वचपा काढावा, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.