Join us  

"वर्षभरापूर्वी माझी कारकीर्द संपल्याचे बोलत होते, आता मला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणतात" - जसप्रीत बुमराह

ICC T20 World Cup 2024, Ind Vs Pak: एक वर्षापूर्वी जेव्हा मी दुखापतग्रस्त होतो, तेव्हा माझी कारकीर्द संपल्याचे म्हटले जात होते. पण, आता तेच लोक मला सर्वोत्तम म्हणत आहेत, असे भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 5:56 AM

Open in App

न्यूयॉर्क - एक वर्षापूर्वी जेव्हा मी दुखापतग्रस्त होतो, तेव्हा माझी कारकीर्द संपल्याचे म्हटले जात होते. पण, आता तेच लोक मला सर्वोत्तम म्हणत आहेत, असे भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने सांगितले. पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताच्या विजयात बुमराहने निर्णायक भूमिका निभावली. 

२०२२ साली बुमराहने पाठीच्या खालच्या बाजूला स्ट्रेस फ्रॅक्चरसाठी शस्त्रक्रिया करून घेतली होती. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळता आले नव्हते. यानंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांंत पुन्हा खेळण्याबाबत त्याच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्हही उपस्थित झाले होते. मात्र, बुमराहने गेल्या एका वर्षात तिन्ही प्रकारांमध्ये मिळून ६७ बळी घेत टीकाकारांची बोलती बंद केली. 

बुमराहने पाकविरुद्धच्या सामन्यानंतर टीकाकारांना लक्ष्य करत म्हटले की, एक वर्षाआधी जे लोक मी पुन्हा खेळू शकणार नाही असे बोलत होते, तेच आज मला सर्वोत्तम म्हणत आहेत. सामन्यादरम्यान मी सर्वोत्तम गोलंदाजी करतोय की नाही, यावर जास्त लक्ष देत नाही. त्याउलट, मी परिस्थितीनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मला माहितेय हे रटाळ उत्तर आहे. पण, मी अशाच प्रकारे लक्ष केंद्रित करतो.  

आयपीएल सत्र संपवून लगेच टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आल्यानंतरही भारतीय गोलंदाजांचा थकवा दिसून आला नाही. याविषयी बुमराह म्हणाला की, आयपीएल गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरले नाही. मात्र, आम्ही थकवा घेऊन येथे आलो नाही, याचा आनंद आहे. आम्हाला येथे पूर्ण मदत मिळत आहे. 

जेव्हा कधी खेळपट्टीकडून मदत मिळते, तेव्हा गोलंदाज अतिउत्साही होण्याची शक्यता असते. फलंदाजांना जाळ्यात अडकविण्यासाठी बाउन्सर, आउटस्विंगर, इनस्विंगर टाकले जाण्याची शक्यता असते. पण, असे करण्याची गरज नसते. मी हेच शिकलोय.- जसप्रीत बुमराह

टॅग्स :आयसीसी विश्वचषक टी-२०भारत विरुद्ध पाकिस्तानजसप्रित बुमराह