- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर)
भारत आज यजमान अमेरिकेच्या आव्हानाचा सामना करेल. अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत केल्याने या सामन्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेने नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरुवात केली आहे. पण, आतापर्यंत त्यांनी केलेली कामगिरी शानदार ठरली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर त्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे. भारतानेही पाकिस्तानला नमवून आगेकूच केली असल्याने हा सामनाही रंगतदार होण्याची आशा आहे.
कागदावर भारतीय संघ जबरदस्त भक्कम दिसत आहे. पण, हे टी-२० क्रिकेट आहे आणि येथे कोणत्याही संघाला हलक्यात घेण्याची चूक करू नये. जर अमेरिकेला गृहीत धरण्याची चूक केली, तर भारतीयांना अडचणीचा सामना करावा लागेल. अमेरिकेचा पराभव झाला, तर क्रिकेटप्रेमींना विशेष काही वाटणार नाही. सर्वांसाठी हा अपेक्षित निकाल ठरेल. पण, जर का अमेरिकेने पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करत बाजी मारली, तर मात्र मोठी खळबळ माजेल. त्यामुळे अमेरिकेकडे गमावण्यासारखं काही नसल्याने या सामन्यात ते मोकळेपणे खेळतील आणि दबाव राहणार तो भारतावर.
खेळाडूंना फॉर्म मिळवण्याची संधी
खेळपट्टी पुन्हा एकदा निर्णायक ठरेल. गोलंदाजांना जास्त मदत मिळत असल्याने एकप्रकारे फलंदाजांना अमेरिकेविरुद्ध लय मिळवण्याची मोठी संधी मिळाली आहे. विराट कोहली अपयशी ठरला आहे, काही प्रमाणात रोहित शर्माही लौकिकानुसार कामगिरी करण्यात यशस्वी ठरलेला नाही. रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव यांच्याकडे सुपर आठ फेरीसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी ही एक संधी असेल. जे खेळाडू अद्याप फॉर्ममध्ये आले नाहीत, त्यांच्याकडे अमेरिका आणि कॅनडाविरुद्धचे सामने तयारी करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
...तर येईल टी-२० क्रिकेटची लाट
खेळपट्टीचे स्वरूप पाहता अतिरिक्त फिरकीपटू खेळवावा का, यावरही भारतीय संघाला विचार करावा लागेल. आता भारताकडे काही पर्याय वापरून पाहण्याची संधी आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे, दोन सामने जिंकले आहेत. भारतीय संघ या सामन्यात नक्कीच प्रबळ विजेता आहे. दुसरीकडे, अमेरिकेकडेही स्वत:ची क्षमता तपासून पाहण्याची संधी आहे. जर अमेरिकेने भारताला धक्का दिला, तर या देशात टी-२० क्रिकेटची एकप्रकारची लाट निर्माण होईल. त्यामुळे सर्व दबाव भारतावर राहील. अमेरिका घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांच्यावर इतका दबाव नसेल.
भारत-अमेरिका पहिल्यांदाच टी-२० क्रिकेटमध्ये आमनेसामने येणार आहेत. अमेरिकेची सध्याची कामगिरी पाहता भारतीय संघाला विजयासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. त्यामुळे दोन्ही देशांतील या पहिल्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स
लाइव्ह स्ट्रिमिंग : डिज्नी हॉटस्टार
Web Title: ICC T20 World Cup 2024, India Vs USA: The pressure will be on India, the hosts are dangerous to take for granted; America has nothing to lose
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.