ICC T20 World Cup 2024 IND vs IRE Live Scorecard - भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडवर दणदणीत विजयाची नोंद केली. गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यानंतर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) कॅप्टन खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. पण, रोहितला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागल्याने चाहत्यांचे टेंशन वाढले, कारण पुढील सामन्यात पाकिस्तानचा सामना करायचा आहे.
रोहित शर्मा खंबीर अन् भारताला मिळाला धीर! नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड अन् २ मोठे पराक्रम
आयर्लंडचा संपूर्ण संघ १६ षटकांत ९६ धावांत तंबूत पाठवण्यात गोलंदाजांना यश आले. अर्शदीप सिंग ( २-३५), हार्दिक पांड्या ( ३-२७), जसप्रीत बुमराह ( ३-१-६-२), अक्षर पटेल ( १-३) आणि मोहम्मद सिराजने ( ३-१-१३-१) प्रभावी मारा केला. आयर्लंडकडून गॅरेथ डेलनी ( २६), जोश लिटल ( १४), कर्टीस कॅम्फर ( १२) व लॉर्कन टकर ( १०) यांनाच दुहेरी धावा करता आल्या. भारतीय गोलंदाजांनी १५ अतिरिक्त धावा दिल्या. पहिल्याच षटकात रोहितला जीवदान मिळाले आणि या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही हे भारतीय फलंदाजांना कळून चुकले. तिसऱ्या षटकात पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट ( २) थर्ड मॅनवर झेलबाद झाला. पण, रोहित खंबीरपणे उभा राहिला आणि आयर्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली.
गड आला पण... १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पुल मारण्याच्या प्रयत्नात एडरने टाकलेला चेंडू रोहितच्या उजव्या खांद्यावर आदळला. रोहितला प्रचंड वेदना झाली आणि त्याने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. रोहितला दुखापतग्रस्त होऊन माघारी जाताना चाहत्यांची चिंता वाढली आहे. रोहितने ३७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावांचे योगदान दिले आणि रिषभ पंतसह ४४ चेंडूंत ५४ धावा जोडल्या.
विजयासाठी ६ धावांची गरज असताना सूर्यकुमार यादव ( २) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. रिषभने २६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३६ धावा करून भारताला १२.२ षटकांत ८ विकेट्सने विजय मिळवून दिला.