ICC T20 World Cup 2024 IND vs IRE Live Scorecard - भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. आयर्लंडने समोर ठेवलेले ९७ धावांचे लक्ष्य भारताने १२.२ षटकांत सहज पार केले. रोहित शर्माचे अर्धशतक आणि रिषभ पंतच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला आणि अ गटात २ गुण व ३.०६५ असा भारी नेट रन रेटसह अव्वल स्थान पटकावले. पण, या विजयानंतरही भारतीय चाहत्यांच्या मनात धाकधुक आहे, कारण रोहितच्या खांद्यावर जोरात चेंडू आदळला आणि त्याला मैदान सोडावे लागले. भारताचा पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे आणि या सामन्यात रोहित खेळणार की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे.
रोहित शर्मा खंबीर अन् भारताला मिळाला धीर! नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड अन् २ मोठे पराक्रम
आयर्लंडचा संपूर्ण संघ १६ षटकांत ९६ धावांत तंबूत पाठवण्यात गोलंदाजांना यश आले. अर्शदीप सिंग ( २-३५), हार्दिक पांड्या ( ३-२७), जसप्रीत बुमराह ( ३-१-६-२), अक्षर पटेल ( १-३) आणि मोहम्मद सिराजने ( ३-१-१३-१) प्रभावी मारा केला. विराट कोहली २ धावांवर बाद झाल्यानंतर रोहित व रिषभ पंत यांनी मोर्चा सांभाळला. रोहितने ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. विजयासाठी ६ धावांची गरज असताना सूर्यकुमार यादव ( २) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. रिषभने २६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३६ धावा करून भारताला १२.२ षटकांत ८ विकेट्सने विजय मिळवून दिला.
रोहितने दुखापतीमुळे सोडले मैदान...
१०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पुल मारण्याच्या प्रयत्नात एडरने टाकलेला चेंडू रोहितच्या उजव्या खांद्यावर आदळला. रोहितला प्रचंड वेदना झाली आणि त्याने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. रोहितला दुखापतग्रस्त होऊन माघारी जाताना चाहत्यांची चिंता वाढली आहे. रोहितने ३७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावांचे योगदान दिले आणि रिषभ पंतसह ४४ चेंडूंत ५४ धावा जोडल्या.
सामन्यानंतर रोहितने दिले दुखापतीवर अपडेट्स...
" खांदा थोडा दुखतोय...'', असे रोहितने सांगितले. तो पुढे म्हणाला, नवीन मैदान, नवीन ठिकाण असल्याने खेळपट्टी कशी मदत करते हे पाहायचे होते. खेळपट्टी स्थिर झालेली नाही, परंतु गोलंदाजांना पुरेशी मदत करणारी आहे. विजय मिळवल्याचा आनंद आहे. बेसिकला चिकटून राहा आणि कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजीचा विचार करा.... अर्शदीप बॉलला उजव्या हाताने स्विंग करू शकतो. या खेळपट्टीवर चार फिरकीपटूंसह खेळू असे वाटत नाही. परिस्थिती अशीच राहिली तर चार जलदगती गोलंदाजांसह खेळू. फिरकीपटू स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात महत्त्वाचे ठऱतील. आम्ही संघाच्या गरजेनुसार बदल करण्यास तयार आहोत.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीबाबत रोहितने सांगितले की, खेळपट्टीकडून काय अपेक्षा करावी हे मला समजत नाही, पण आम्ही त्यापद्धतीने तयारी करू. हा असा सामना असेल जिथे आपल्या सर्व ११ खेळाडूंना एकत्र येऊन योगदान देण्याची गरज आहे. आशा करतो की पाकिस्तानविरुद्ध आम्ही अशीच कामगिरी करू..
Web Title: icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Ire scorecard online - Rohit Sharma will miss the match against Pakistan? Hitman gives injury updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.