ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - भारत-पाकिस्तान यांच्यातला हायव्होल्टेज सामना काही तासांवर येऊन ठेपला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील या सामन्याची सर्व जगाला उत्सुकता आहे, तर प्रथमच अमेरिकेत होत असलेल्या आयसीसी स्पर्धेमुळे तेथील चाहतेही या लढतीसाठी सज्ज आहेत. भारत-पाकिस्तान संघांच्या चाहत्यांनी सामन्याच्या तिकिटांसाठी वाटेत तेवढी किंमत मोजून न्यू यॉर्क गाठले आहे. भारताने आतापर्यंत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सातपैकी सहा सामन्यांत बाजी मारली आहे.
त्यात बाबर आजमच्या संघाचा फॉर्म पाहता, आजही टीम इंडिया भारी पडेल असे वाटत आहे. त्यामुळेच पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar ) याला विनवणी करावी लागत आहे.आजच्या सामन्यात विराट कोहलीवर साऱ्यांच्या नजरा खिळणार आहेत, परंतु कर्णधार रोहित शर्माला फक्त विराटवर अवलंबून राहायचं नाही आणि त्यामुळेच त्याने संघातील सर्व सदस्यांना योगदान देण्याचे आवाहन केले आहे. काल रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून राहणार नाही. संपूर्ण संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. विराटने बांगलादेशविरुद्धचा सराव सामना खेळला नसला तरी त्याने पुरेसा सराव केला आहे. जगभर खेळून त्याला ज्या प्रकारचा अनुभव आला, त्याबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही.
तेच दुसरीकडे अमेरिका संघाकडून हार पत्करावी लागल्याने पाकिस्तानचे मनोबल खचले आहे आणि त्यांना पुनरागमनासाठी प्रचंड इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे. त्यामुळेच शोएब अख्तरने सामन्यापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो म्हणतोय, पाकिस्तान संघासाठी खेळा... खुदा का वास्ता... आज स्वतःसाठी नको, तर वर्ल्ड कपसाठी खेळा. जीव ओतून खेळा... वैयक्तिक रेकॉर्डवर नजर ठेऊ नका. वैयक्तिक रेकॉर्ड लोकं लक्षात ठेवत नाहीत.. जावेद भाईचा सिक्स लक्षात राहिला, माझी कोलकातातील विकेट लक्षात राहिली, चॅम्पियन्स ट्रॉफी लक्षात आहे, २००९चा वर्ल्ड कप लक्षात आहे... लोकं वैयक्तिक रेकॉर्ड नाही, तर पाकिस्तान संघाचा निकाल लक्षात ठेवतात. आज एकमेकांसाठी खेळा, पाकिस्तानसाठी खेळा... पाकिस्तानच्या मोरालसाठी खेळा.. संपूर्ण देशाचे तुमच्याकडे लक्ष आहे.