Join us  

T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : रोहित शर्माचा खणखणीत Six अन् पावसाच्या मुसळधार सरी; वाचा किती वाजल्यानंतर षटकं होतील कमी

सर्व करून मॅच सुरूही झाली, दोन्ही देशांचे राष्ट्रगीत झाले आणि रोहित शर्माने पहिल्या षटकात खणखणीत षटकार खेचून शाहीन आफ्रिदीचे स्वागतही केले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 9:13 PM

Open in App

ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पावसाचा 'खेळ' सुरू आहे... पावसामुळे ७.३० वाजता होणारी नाणेफेक ८ वाजता झाली.. तेव्हा ८.३० वाजता मॅच सुरू होईल असे सांगितले गेले, परंतु नाणेफेक झाल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि मॅच पुन्हा लांबणीवर गेली. सर्व करून मॅच सुरूही झाली, दोन्ही देशांचे राष्ट्रगीत झाले आणि रोहित शर्माने पहिल्या षटकात खणखणीत षटकार खेचून शाहीन आफ्रिदीचे स्वागतही केले. पण, रोहितच्या त्या षटकारानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि खेळाडूंना पुन्हा डगआऊटमध्ये जावे लागले. 

अमेरिकेच्या वेळेनुसार हा सामना सकाळी ११ वाजता खेळवला जात आहे आणि त्यामुळे ही मॅच पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे संपूर्ण दिवस आहे. तरीही सामना न झाल्यास राखीव दिवस नसल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. अशा परिस्थितीत पाकिस्तानसाठी हे मोठे जीवदान असेल. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या सामन्यांच्या तुलनेत आज स्टेडियम खचाखच भरलं होतं. कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनसहच मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने मात्र फॉर्माशी झगडणाऱ्या आजम खानला वगळून ऑलराऊंडर इमाद वासीमला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले.   

रोहित शर्माने तिसरा चेंडू मिडविकेटच्या दिशेने सीमापार पाठवून शाहीन आफ्रिदीला झटका दिला. पण, एक षटकानंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने खेळाडूंना पुन्हा पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. शाहीन आफ्रिदीला वन डे व ट्वेंटी-२०त पहिल्याच षटकात षटकार खेचणारा रोहित हा एकमेव फलंदाज आहे. अमेरिकेत आता ११.४० वाजले आहेत आणि १२.०४ वाजेपर्यंत सामना पुन्हा सुरू न झाल्यास षटकं कमी होण्यास सुरुवात होतील, म्हणजेच भारतीय वेळेनुसार ९.३० वाजेपर्यंत सामना सुरू व्हायला हवा. अन्यथा षटकं कमी होण्यास सुरूवात होईल. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्मा