Join us  

T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : Unpredictable पाकिस्तान! अमेरिकेकडून हरणाऱ्या शेजाऱ्यांनी टीम इंडियाला स्वस्तात All Out केले

ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - पाकिस्तानच्या संघाला unpredictable का म्हटले जाते याचा प्रत्यय आज आलाच असेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 11:03 PM

Open in App

ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - पाकिस्तानच्या संघाला unpredictable का म्हटले जाते याचा प्रत्यय आज आलाच असेल... अमेरिकेविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तानकडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध चांगल्या कामगिरीची कोणालाच अपेक्षा नव्हती. पण, त्यांच्या गोलंदाजांनी सर्वांना अनपेक्षित धक्का दिला. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा बाबर आजमचा निर्णय त्यांनी सार्थ ठरवला. भारताकडून रिषभ पंत व अक्षर पटेल वगळल्यास सर्वांनी नांग्या टाकल्या. 

मॅच सुरू असताना अनोखळी विमान मैदानावर उडाले अन् त्यावरील मॅसेज होतोय Viral

पावसाच्या खेळानंतर टीम इंडियाची पडझड सुरू झाली. रोहित शर्माने तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचून आशादायी चित्र रंगवले, परंतु पावसाच्या विश्रांतीनंतर मॅच सुरू होताच त्यावर पाणी फिरले. नसीम शाहने भारताला पहिला धक्का देताना विराट कोहलीला ( ४) बाद केले. त्यानंतर शाहीन आफ्रिदीने रोहितची ( १३) विकेट मिळवली. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेलने  ( २०) दम दाखवला आणि रिषभसह ३९ धावा जोडल्या. नसीमने त्याला बाद केले. आज रिषभचा दिवस होता आणि त्याचे ३ झेल सुटले. त्याचा फायदा उचलताना त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना चोप दिला. 

रिषभने १०व्या षटकात हॅरिस रौफला सलग तीन चौकार खेचून संघाला ३ बाद ८१ धावांपर्यंत पोहोचवले. रिषभला रोखणे पाकिस्तानसाठी अवघड होऊन बसले, कारण तो त्याचे आडवेतिडवे शॉट्स अगदी सहजतेनं खेळून धावांचा पाऊस पाडत होता. पण, सूर्यकुमार यादव ( ७) रौफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. शिवम दुबेला ( ३) फलंदाजीची संधी मिळाली, परंतु नसीम शाहने संथ चेंडूवर त्याला कॉट अँड बोल्ड केले. मोहम्मद आमीरने १५व्या षटकातच भारतीयांना हादरवून सोडले. आमीरच्या गोलंदाजीवर रिषभने आक्रमक फटका खेचला, परंतु यावेळी त्याचा झेल घेतला गेला. रिषभ ३१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ४२ धावांवर माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर रवींद्र जडेजा शॉर्ट मिड ऑफला इमाद वासीमला सोपा झेल देऊ परतला.

भारताची अवस्था ७ बाद ९७ अशी झाली होती... नशीबाने आमीरची हॅटट्रिक पूर्ण होऊ नाही शकली. नसीम शाहने ४-०-२१-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. हार्दिक पांड्याकडून ( ७) अखेरच्या षटकांत खूप अपेक्षा होत्या, परंतु इफ्तिखर अहमदने भन्नाट झेल घेतला. हॅरिस रौफने सलग दुसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहला भोपळ्यावर माघारी पाठवले. रौफने २१ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारत १९ षटकांत ११९ धावांवर ऑल आऊट झाला.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहलीरिषभ पंतरोहित शर्मा