ICC T20 World Cup 2024 IND vs USA Live Scorecard - सलग दोन विजय मिळवणारे भारत आणि अमेरिका हे दोन संघ आज सुपर ८ मधील आपली जागा निश्चित करण्यासाठी एकमेकांना भिडणार आहेत. प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणाऱ्या अमेरिकेने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कॅनडावर विजय मिळवून मोहिमेची सुरुवात केली आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दुसरीकडे, भारताने पहिल्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध सहज विजय मिळवला आणि त्यानंतर गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानविरुद्ध १२० धावांचा यशस्वी बचाव केला.
चांगल्या नेट रन रेटसह टीम इंडिया अ गटात गुणतालिकेत आघाडीवर आहेत, तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. आज हे उभय संघ समोरासमोर आहेत आणि विजेता संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल. पराभूत झालेल्या संघाला अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवणे आवश्यक असेल. IND vs USA सामना न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे आणि हवामानामुळे या सामन्यात व्यत्यय येण्याची अपेक्षा आहे.
जर IND vs USA सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय?भारत-अमेरिका यांच्या सामन्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. हा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळेल आणि हे दोन्ही संघ ५ गुणांसह सुपर ८ साठीही पात्र ठरतील. त्याचवेळी पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात येईल.
भारत आणि अमेरिका संघाकडून पराभूत पत्करणाऱ्या पाकिस्तानने काल कॅनडावर विजय मिळवला आणि स्वतःला सुपर ८ साठीच्या शर्यतीत कायम राखले. या विजयासह पाकिस्तानने -०.१५० वरून नेट रन रेट ०.१९० असा सुधारला, परंतु अमेरिका अजूनही ०.६२६ अशी पुढेच आहे. त्यामुळे नेपाळविरुद्ध त्यांना हे अंतर कमी करण्यासाठी मोठा विजय मिळवावा लागेल. हा सामना जिंकून त्यांचे ४ गुण होतील. पण, जर भारत-अमेरिका सामना प्रत्येकी १-१ गुणावर सुटला तर हे दोन्ही संघ प्रत्येकी ५ गुणांसह पुढच्या फेरीत सहज जातील.