ICC T20 World Cup 2024 IND vs USA Live Scorecard - भारतीय संघाला आयसीसीच्या नव्या नियमाचा फायदा झालेला पाहायला मिळाला.
विराट कोहलीचे अपयशाचे सत्र याही सामन्यात कायम राहिले आणि सौरभ नेत्रावळकरने त्याला गोल्डन डकवर माघारी पाठवले. नेत्रावरळकरने त्याच्या पुढच्या षटकात कर्णधार रोहित शर्माला ( ३) चुकीचा फटका मारण्यास भाग पाडले आणि हरमीत सिंगने अफलातून झेल घेतला. भारताचे दोन्ही सलामीवीर १० धावांवर तंबूत परतले. सूर्यकुमार यादव व रिषभ पंत यांनी काहीकाळ खिंड लढवली, परंतु अली खानने अप्रतिम चेंडूवर रिषभचा ( १८) त्रिफळा उडवून भारताला ३९ धावांवर तिसरा धक्का दिला. अलीने टाकलेला चेंडू खूपच खाली राहिला आणि रिषभचा त्रिफळा उडवला.
गोलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीचा वापर अमेरिका चांगल्यारितीने करून घेत होती आणि त्यामुळे शिबम दुबे दडपणाखाली खेळताना दिसला. तो दोनवेळा रन आऊट होता होता वाचला. सूर्यकुमारनही अमेरिकन गोलंदाजांचा मारा पाहून हडबडला. १२ षटकांत अमेरिकेच्या जिथे ४ बाद ५९ धावा होत्या, तिथे भारताला ३ बाद ५५ धावा करता आल्या होत्या. सूर्याचा २२ धावांवर असताना सौरभकडून झेल सुटला आणि भारतीय फलंदाजाच्या पत्नीने देवाचे आभार मानले. ही कॅच सोडून अमेरिकेनं खरं तर मॅच गमावली. सूर्याने त्यानंतर फटकेबाजी सुरू केली.
३० चेंडूंत ३५ धावा भारताला विजयासाठी हव्या होत्या. १६ वे षटक पूर्ण करण्यासाठी अमेरिकेने अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेतला आणि त्यामुळे भारताला ५ पेनल्टी धावा मिळाल्या. त्यामुळे अंतर ३० चेंडू ३० धावा असे झाले. आयसीसीच्या नव्या नियमानुसार दोन षटकांमधील अंतर हे ६० सेकंदाच्या वर असता कामा नये आणि तीनवेळा अशी चूक केल्यास संघाल ५ धावांची पेनल्टी बसते.