मेलबोर्न : ‘मिचेल मार्शच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध पराभव पत्करण्यास काहीही हरकत नाही. कारण असे केल्यास इंग्लंडला विश्वचषकाबाहेर काढता येईल,’ असे माजी कर्णधार टीम पेन याने सांगितले. गत विजेत्या इंग्लंडचा पावसामुळे एक सामना रद्द झाला. त्यांनतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा मोठा पराभव झाला. त्यामुळे सुपर आठचा त्यांचा प्रवास कठीण झाला आहे.
ब गटात इंग्लंडचा केवळ एक गुण असून त्यांची धावगती उणे १.८०० अशी आहे. पुढील दोन्ही सामने जिंकले तरी इंग्लंड स्कॉटलंडच्या पुढे जावू शकणार नाही. सुपर आठसाठी इंग्लंडला दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. पेन पुढे म्हणाला ,‘ऑस्ट्रेलियाने सामना गमवावा, असे मलाही वाटत नाही, पण इंग्लंडला बाहेर करण्यासाठी असे करणे गरजेचे आहे. दुसरा मार्ग असाही असू शकतो की स्कॉटलंडला चुरशीच्या स्थितीत येऊ द्यायला हवे.’