न्यूयाॅर्क - बांगलादेशचा युवा फलंदाज तौहित हृदयने सांगितले की, अनुभवी फलंदाज महमदुल्लाह रियाद याला पायचित बाद देण्याचा मैदानावरील पंचाचा निर्णय चुकीचा होता, त्यामुळे चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यानंतरही आमच्या संघाला चार धावा मिळू शकल्या नाहीत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आम्हाला चार धावांनी पराभूत व्हावे लागले. डीआरएसनंतर महमदुल्लाहला नाबाद ठरविले असले तरी चार धावा मिळाल्या नाहीत.
दक्षिण आफ्रिकेच्या ११४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला सात बाद १०९ धावाच करता आल्या. आयसीसीच्या वादग्रस्त नियमामुळे बांगलादेशने लेगबायच्या चार धावा गमावल्या. ओटनील बार्टमॅनच्या चेंडूवर पंच सॅम नोगास्की यांनी महमदुल्लाहला पायचित बाद दिले होते. तेव्हा चेंडू सीमारेषेबाहेर गेला; पण महमदुल्लाहने डीआरएस घेतल्यामुळे चेंडू ‘डेड’ मानला गेला. महमदुल्लाह नाबाद ठरला; पण बांगलादेशने सामना चार धावांनी गमावला.
बांगलादेशला चार धावा मिळू शकल्या नाहीत याबाबत हृदय म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचे तर हा चांगला निर्णय नव्हता. हा एक रोमांचक सामना होता. पंचांनी बाद दिले, पण तो निर्णय आमच्यासाठी थोडा कठीण होता. त्या चार धावांमुळे सामन्याचे चित्र बदलले असते. त्यामुळे मी याबाबतीत काहीच बोलू शकत नाही.
आयसीसीच्या नियमांबाबत तो म्हणाला की, नियम आयसीसीने बनविले आहेत ते माझ्या हातात नाहीत. पण त्यावेळी त्या चार धावा आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. पंचांनी निर्णय दिला आहे त्यामुळे पंचच निर्णय सांगू शकतात. तीदेखील माणसं आहेत आणि माणसांकडून चुका होऊ शकतात. आम्हाला दोन-तीन वाइड चेंडूही दिले नाहीत. अशा सामन्यात प्रत्येक धाव महत्त्वाची असते.
आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियमानुसार जर मैदानावरील पंचांनी फलंदाजाला पायचीत बाद दिले आणि फलंदाजाने डीआरएसचा आधार घेतला तर तिसऱ्या पंचांद्वारे निर्णय येण्याच्या स्थितीत कोणतीही अतिरिक्त धाव मिळणार नाही. अशा परिस्थितीत लेगबायच्या धावाही दिल्या जात नाहीत.
Web Title: ICC T20 World Cup 2024, SA Vs Ban: The decision of the field umpire was wrong! Bangladesh lost for 4 runs due to DRS, Tauhid Hriday charged
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.