मुंबई - 'टी-२० विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची भारतीय संघाकडे मोठी संधी आहे. स्पर्धेत संघाला एका टी-२० संघाप्रमाणे खेळावे लागेल. संघात मोठी गुणवत्ता असून जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय फलंदाजांना निडरपणे खेळावे लागेल,' असे भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले.
गांगुली यांनी सध्या सुरु असलेल्या भारताच्या प्रशिक्षकदाच्या नियुक्तीबाबतही मत मांडले. त्यांनी भारतीय व्यक्तीच प्रशिक्षक असावा, असे ठाम मत मांडले. ब्ल्यू ओशन कॉर्पोरेशनच्या कार्यक्रमात गांगुली यांनी भारताचा आगामी प्रशिक्षक आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेविषयी मत व्यक्त केले. भारताचा पुढील प्रशिक्षक म्हणून सध्या माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचे नाव आघाडीवर आहे. गांगुली म्हणाले की, 'मी भारतीय प्रशिक्षक नेमण्याच्या बाजूने आहे. आपल्या देशात मोठी गुणवत्ता आहे. आपल्या देशात अनेक यशस्वी खेळाडू आहेत, त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये बहुमूल्य योगदान दिले. त्यांना व्यवस्थापनामध्ये समाविष्ट करुन घेतले पाहिजे.' प्रशिक्षक म्हणून गंभीरच्या पर्यायाविषयी गांगुली म्हणाले की, 'गंभीरने या पदासाठी अर्ज भरला आहे की, हे आधी पहावे लागेल. कारण, पहिले त्याला अर्ज भरावा लागेल, त्यानंतरच त्याची प्रशिक्षकपदी नियुक्ती होईल. माझ्या मते यासाठी २७ मेपर्यंत अंतिम मुदत होती. पण, या मुदतीत वाढ करण्याचा अधिकार बीसीसीआयकडे आहे. जर गंभीरने अर्ज दाखल केला, तर प्रशिक्षकदासाठी त्याच्या रुपाने चांगला पर्याय मिळेल.'
टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या कामगिरीविषयी गांगुली म्हणाले की, 'भारतीय फलंदाजांना निडरपणे खेळावे लागेल. या संघातील सर्व खेळाडू गुणवान आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडू भारताला जेतेपद पटकावून देण्याची क्षमता राखून आहेत. भारतीय संघाने अतिरिक्त फलंदाजासह खेळून पहिल्या चेंडूपासून आक्रमकतेने खेळले पाहिजे.' तसेच, 'भारताच्या डावाची सुरुवात रोहित आणि विराट यांनी करावी,' असेही गांगुली यांनी सांगितले.
'इम्पॅक्ट प्लेयर नियम मला आवडतो'
यंदा आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियमावरुन बरीच चर्चा झाली. काहींनी या नियमाचे समर्थन केले, तर काहींनी विरोध दर्शवला. गांगुली यांनी याबाबत आपले मत मांडले की, 'मला इम्पॅक्ट प्लेयर नियम आवडतो. आयपीएलमध्ये मला केवळ एक बदल अपेक्षित आहे की, मैदानांची सीमारेषा थोडी वाढवली पाहिजे. ही शानदार स्पर्धा आहे. इम्पॅक्ट प्लेयर नियम चांगला असून केवळ या विशेष खेळाडूचा निर्णय नाणेफेकीच्या आधी झाला पाहिजे. नाणेफेकीच्या आधी इम्पॅक्ट प्लेयर जाहीर करण्यासाठी कौशल्य आणि योग्य रणनितीची गरज भासेल.'
Web Title: ICC T20 World Cup 2024: Sourav Ganguly gives valuable advice to Indian batsmen to play fearlessly in T20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.