न्यूयाॅर्क - आपल्या प्रभावी गोलंदाजीने भारताच्या दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणणारा अमेरिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर मुंबई संघातील आपले जुने सहकारी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना भेटून खूप खूश झाला. दहा वर्षांनी दोघांना अमेरिकेत भेटणे विशेष आहे, असेही तो म्हणाला.
भारतात जन्मलेल्या या वेगवान गोलंदाजाने सुरुवातीच्या दोन षटकांत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना बाद केले. त्याने याआधी पाकिस्तानविरुद्धही शानदार गोलंदाजी करत संघाला सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय मिळवून दिला होता. व्यवसायाने साॅफ्टवेअर अभियंता असलेल्या नेत्रावळकरने १९ वर्षांखालील विश्वचषकात (२०१०) भारतीय संघासाठी खेळण्याशिवाय सूर्यकुमारच्या साथीत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
नेत्रावळकर सामन्यानंतर म्हणाला की, मी दोघांना एक दशकापेक्षाही अधिक काळानंतर भेटलो, हे विशेष होते. आम्ही जुने दिवस आठवत होतो; कारण आम्ही लहानपणापासून १५ वर्षांखालील, १७ वर्षांखालील गटात सोबत खेळत होतो. आम्ही जेथून वेगळे झालो, तेथूनच पुढे जात आहोत, असे वाटले. रोहित मुंबईत माझा वरिष्ठ होता. मी त्याच्यासोबत खेळलो आहे. मी विराटसोबत जास्त क्रिकेट खेळलो नाही. पण, त्याने आमच्या कामगिरीचे कौतुक केले.
ओरॅकल कंपनीत काम करणाऱ्या या ३२ वर्षीय खेळाडूने १९ वर्षांखालील विश्वचषक खेळल्यानंतर शिष्यवृत्ती मिळाल्यावर काॅर्नेल विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत आल्यानंतर त्याच्या क्रिकेटच्या प्रवासाला थोडा विराम मिळाला. पण त्याने पुन्हा खेळायला सुरुवात केली आणि अमेरिका संघात स्थान मिळवले. शानदार कामगिरी केल्याचा आनंदटी-२० विश्वचषकातील शानदार कामगिरीबाबत विचारल्यावर तो म्हणाला की, मी आता या यशाचा आनंद घेत आहे. मागील दोन सामने मोठे होते. आम्ही एक संघ म्हणून शानदार कामगिरी केली, याचा आनंद आहे. परिस्थिती कशीही असली तरी नेहमी आनंदी राहायला हवे. सौरभचे कुटुंबीय अद्यापही भारतातच आहेत. भारताविरुद्धच्या कामगिरीबाबत तो म्हणाला की, कोणाचा सामना करत आहोत आणि सामन्याचा निकाल काय लागेल, याचा आम्ही विचार करत नाही. कामगिरी चांगली झाल्याचा आनंद आहे. विराटला बाद करण्यासाठी नेहमीचाच चेंडू टाकला. त्यासाठी मला अतिरिक्त प्रयत्न करावा लागला नाही, असेही तो म्हणाला.