लंडन - इंग्लंडचा स्टार बेन स्टोक्स हा आगामी टी-२० विश्वचषकात खेळणार नाही. त्याने संपूर्ण ताकदीने गोलंदाजी करण्यासाठी फिटनेस मिळविण्यावर भर देत असल्याचे कारण देत मनाप्रमाणे अष्टपैलुत्व गाजविण्यास यामुळे आपल्याला मदत होईल, असे स्टोक्सने म्हटले आहे.
२०२२ ला ऑस्ट्रेलियात आयोजित मागच्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजयी धाव स्टोक्सनेच घेतली होती. इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या स्टोक्सने वेस्ट इंडीज आणि अमेरिकेच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित या विश्वचषकाच्या दोन महिने आधी आपला निर्णय ईसीबीला कळविला. ईसीबीकडून आलेल्या निवेदनात स्टोक्स म्हणाला, ‘मी कठोर मेहनत घेत आहे. गोलंदाजी फिटनेस मिळविण्यावर भर असून त्यामुळे उत्कृष्ट अष्टपैलू बनण्यास मदत होईल. भविष्यात पुन्हा मैदान गाजविण्याचे माझे लक्ष्य आहे. स्टोक्स भारत दौऱ्यात इंग्लंडचा कसोटी कर्णधार होता. भारताने ही मालिका ४-१ अशी जिंकली. भारतात गोलंदाजीसाठी पूर्णपणे सज्ज नव्हतो, अशी स्टोक्सने कबुली दिली. गुडघ्यावरील शस्त्रक्रिया आणि नऊ महिने गोलंदाजीविना राहिल्याने पुन्हा चेंडू हातात घेणे सोपे नव्हते.’