- मतीन खान(स्पोर्ट्स हेड - सहायक उपाध्यक्षलोकमत पत्रसमूह)
केवळ ११९ धावांवर अखेरचा फलंदाज अर्शदीप सिंग धावबाद झाला तेव्हा २०२१ च्या टी-२० विश्वचषकातील सामन्यासारखा पाकिस्तान दहा गड्यांनी विजयी होईल का, अशी भीती वाटू लागली होती. अनेकांनी टीव्ही बंद केले. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकसंख्या दोन कोटींहून घटून दहा लाखांवर आली. पण, गोलंदाजांनी भारताला सामना जिंकून दिला. या शानदार विजयाचे जितके कौतुक व्हावे तितके थोडे आहे. चाहत्यांना खरोखर अशी अपेक्षा होती? प्रामाणिकपणे सांगा.
३९ वर्षांआधी असेच घडले...भारत-पाकिस्तान यांच्यात २२ मार्च १९८५ रोजी शारजाह येथे झालेला रॉथमन्स चषकाचा सामना आठवतो. या सामन्याच्या १२ दिवस आधी भारताने ऑस्ट्रेलियात पाकला नमवून विश्व चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळचा तो सर्वांत ग्लॅमरस विजय होता. रंगीत टीव्हीवर सर्वच सामन्यांचे थेट प्रक्षेपण झाले. फायनलमध्ये रवी शास्त्रीला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ पुरस्कारासह ऑडी हंड्रेड कार मिळताच भारतीयांची छाती गर्वाने फुलली होती. शास्त्री रात्रभरात ‘पोस्टर बॉय’च्या रूपाने मुलींच्या दिवाणखान्यातील भिंतीवर सजला होता.
इम्रान नावाचे वादळरॉथमन्स ट्रॉफीच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर इम्रान खानने रवी शास्त्रीला पायचीत केले. पाठोपाठ श्रीकांत (६), वेंगसरकर (१), गावसकर (२), मोहिंदर (५) आणि मदनलाल (११) यांना माघारी धाडले. इम्रानने केवळ १४ धावांत ६ बळी घेतले.
अझहर-कपिलने सावरलेअझहर (४७) आणि कपिल (३०) यांच्या झुंजार खेळीशिवाय मदनलाल आणि अवांतर ११-११ धावांच्या योगदानाच्या बळावर भारताने १२५ पर्यंत मजल मारली. भारतात सर्वत्र सन्नाटा पसरला होता. १२ दिवसांपूर्वीच्या पराभवाचा वचपा काढला जाईल का, या भीतीपोटी भारतीय संघावर तोंडसुख घेणे सुरू झाले होते.चित्र पालटले,
चाहत्यांचे बोल बदललेसायंकाळ होत असताना माहोल बदलला. मोहसिन, मुदस्सर, मियाॅंदाद, इम्रान, रमीझ राजा, मंजूर इलाहीसह ११ व्या स्थानावरील वसीम अक्रम अशा दिग्गजांचा भरणा असलेला पाक संघ केवळ ८७ धावांत गारद झाला. मियाॅंदाद, इम्रान, अशरफ, तौसिफ, अक्रम यांना खाते उघडता आले नव्हते. कपिलने १७ धावांत ३ तर शिवरामकृष्णन, शास्त्री यांनी २-२ तसेच बिन्नी-मदनलाल यांनी एकेक गडी बाद केला.
अप्रतिम गावसकरपाकच्या खळबळजनक पराभवात सुनील गावसकर यांनी स्लिपमध्ये चार शानदार झेल टिपले. पाकच्या पराभवानंतरही इम्रान खानला भेदक गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताने काही तासांत ३८ धावांनी विजय नोंदवून टीकाकारांची बोलती बंद केली. पुढे भारताने चार देशांचा समावेश (ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा सहभाग) असलेली रॉथमन्स चषक ट्रॉफी ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये नमवून जिंकली. क्रीडाप्रेमी या नात्याने समजून घ्यायला हवे की, खेळाडू मैदानात नेहमी शंभर टक्के योगदान देतात. ते जिंकण्यासाठीच खेळतात. पण, माणूस या नात्याने त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. त्यांच्या यशाचा आनंद साजरा करता, मग त्यांच्या अपयशावेळी संयम बाळगा, त्यांना साथ द्या... किमान सामना संपण्याची तरी प्रतीक्षा करा!