मुंबई : ‘ज्या मुलाला मी माझ्यासमोर लहानाचा मोठा होताना पाहिलंय, त्या मुलाच्या हाती विश्वचषक पाहणे, यासारखा आनंद नाही. हा विजय विशेष असून, मला सर्वात मोठी गुरुदक्षिणा मिळाली आहे,’ असे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला घडविणारे त्याचे शालेय प्रशिक्षक आणि ‘द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त दिनेश लाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान अनेकदा रोहित शर्माचा उल्लेख ‘बोरिवली का लडका’ असा झाला. याबाबत लाड म्हणाले की, ‘रोहितच्या कामगिरीने बोरिवलीचे नाव जगात गाजले, याचा अभिमान आहे. मी सुमारे ३२ वर्षांपासून बोरिवलीमध्ये क्रिकेट प्रशिक्षण देतोय. त्यामुळे रोहितचा उल्लेख सातत्याने बोरिवलीचा मुलगा, असा झाला याचा वेगळा आनंद आहे.’
विराट कोहली आणि रोहित यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यामुळे भारतीय चाहते भावुकही झाले. याबाबत लाड म्हणाले की, ‘माझ्या मते, दोघांनी योग्य निर्णय घेतला. युवा खेळाडूंनाही संधी देणे गरजेचे आहे. टी-२० वेगवान क्रिकेट असल्याने येथे काही मर्यादाही आहेत. महत्त्वाचे म्हणजे आता पुढे एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक तसेच, जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धा आहे, याकडेच दोघांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे आता रोहितच्या हातात एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक आणि डब्ल्यूटीसी जेतेपद पाहण्याची इच्छा आहे.’
रोहित अजिबात बदलला नाही!
लाड यांनी रोहितच्या नेतृत्वाबद्दल सांगितले की, ‘कर्णधार म्हणून रोहित बदलल्याचे अजिबात दिसत नाही. तो जसा स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे (एसव्हीआयएस) नेतृत्व करायचा, तसेच नेतृत्व त्याने भारतीय संघाचे केले. शाळेत असतानाही तो सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन पुढे जायचा आणि भारतीय संघातही तो तेच करतोय. त्यामुळे तेव्हाचा रोहित आणि आताचा रोहित सारखाच असल्याचे मला वाटतं.’
दीपाली लाड यांचे मोलाचे योगदानरोहितपासून शार्दूल ठाकूर, आतिफ अत्तरवाला, असे अनेक खेळाडू आपल्या उमेदीच्या काळात लाड यांच्या घरी राहिले. यामध्ये लाड यांच्या पत्नी दीपाली यांचे मोठे योगदान राहिले. त्यांनी या सर्व खेळाडूंची आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. याविषयी दिनेश लाड म्हणाले की, ‘दीपालीने पाठिंबा दिला नसता, तर कदाचित या खेळाडूंचा प्रवास आणखी खडतर झाला असता. ती या खेळाडूंसाठी अन्नपूर्णा ठरली आहे.’