नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनालाआयसीसीने मोठे गिफ्ट दिले आहे. आयसीसीने महिला टी-20 खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये स्मृती आणि अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा यांनी मोठी झेप घेतली. ताज्या क्रमवारीनुसार दोन्हीही भारतीय खेळाडू फलंदाज आणि गोलंदाजाच्या यादीत पहिल्या क्रमांकाच्या जवळ पोहोचल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल फळीतील फलंदाज मानधनाने बांगलादेशातील सिल्हेट येथे झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात 25 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी केली होती. स्मृतीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय मिळवला.
स्मृती मानधनाची ICC क्रमवारीत गरूडझेपदरम्यान, स्मृती मानधनाने 780 रेटिंग गुणांसह क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर या यादीत ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी 793 गुणांनी पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे स्मृती आणि मुनी यांच्यात केवळ 13 गुणांचा फरक आहे. अलीकडेच महिला आशिया चषकाची स्पर्धा पार पडली ज्यामध्ये भारतीय संघाने शानदार विजय मिळवून सातव्यांदा किताब पटकावला. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात थायलंडविरूद्ध दीप्ती शर्माने केवळ 7 धावा देऊन 3 बळी पटकावले होते. तर अंतिम सामन्यात देखील तिने चमकदार कामगिरी केली होती.
भारतीय खेळाडूंचा डंका दीप्ती शर्माने आशिया चषकाच्या स्पर्धेत सर्वाधिक 13 बळी पटकावले होते. मात्र आयसीसी क्रमवारीत दीप्ती सध्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, इंग्लंडची फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन तिच्यापेक्षा 14 गुणांनी पुढे असून पहिल्या स्थानावर विराजमान आहे. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेली भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर स्नेह राणाने देखील सर्वोत्तम कामगिरी करून 10व्या स्थानावर मजल मारली आहे.
भारतीय संघाची सलामीवीर शेफाली वर्मा हिने आयसीसी क्रमवारीत एक पाऊल पुढे टाकत सातवा क्रमांक गाठला आहे. तर कर्णधार हरमनप्रीत कौर 14व्या स्थानी स्थित आहे. श्रीलंकेविरुद्ध 41 चेंडूत 42 धावा करणारी पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफने तीन स्थानांची प्रगती करत 29व्या स्थानावर मजल मारली आहे, तर अष्टपैलू निदा दार फलंदाजांच्या यादीत 38व्या तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सातव्या स्थानावर पोहोचली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"