ICC "Team of the Tournament" of World Cup 2023 - ऑस्ट्रेलियाने रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९५ हजार प्रेक्षकांच्या समोर भारतीय संघावर विजय मिळवून वर्ल्ड कप उंचावला. भारतीय संघाला २४० धावांत गुंडाळल्यानंतर ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन यांच्या १९५ धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का केला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला... असे असले तरी आयसीसीने जाहीर केलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम संघात त्यांच्या केवळ दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंना संधी मिळाली आहे. रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) या संघाचे नेतृत्व सोपवले गेले आहे.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक हा रोहितसह सलामीला दिसतोय.. क्विंटनने या स्पर्धेत १०७.२ च्या सरासरीने ५९४ धावा चोपल्या आहेत आणि त्यात चार शतकांचा समावेश आहे. बांगलादेशविरुद्ध त्याने १७४ धावांची विक्रमी फटकेबाजी केली होती. रोहित शर्मा व विराट कोहली या दोघांनीच त्याच्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
रोहित शर्माकडे या संघाचे नेतृत्व सोपवले गेले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग १० विजयांची नोंद करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्याने या स्पर्धेत ५९७ धावा कुटल्या. सलामीला येऊन भारतीय संघाला दमदार सुरुवात करून देण्याचं काम रोहितनं चोख बजावलं. त्याने १२५.९४च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली आणि ग्लेन मॅक्सवेल व हेनरिच क्लासेन यांचाच स्ट्राईक रेट त्याच्यापेक्षा जास्त राहिला आहे.
विराट कोहली या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक ७६५ धावा करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. सचिन तेंडुलकरने २००३ मध्ये ६७३ धावा केल्या होत्या आणि विराटने हा विक्रम मोडला. त्याने ११ पैकी ९ सामन्यांत ५०+ धावा केल्या आणि त्यापैकी ३ खेळीचे शतकात रुपांतर केले. न्यूझीलंडला उपांत्य फेरीत हार मानावी लागली असली तरी त्यांची कामगिरी विसरता कामा नये. डॅरिल मिचेलने वर्ल्ड कपमध्ये ६९च्या सरासरीने ५५२ धावा केल्या आहेत. उपांत्य फेरीत भारताविरुद्ध त्याने १३४ धावांची खेळी केली होती, परंतु किवींना हार मानावी लागली.