India vs England Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत तुफान फॉर्मात असलेल्या इंग्लंडचा कर्णधार जो रूटनंआयसीसी जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ICC Test batting rankings आज जाहीर करण्यात आली आणि त्यात हिटमॅन रोहित शर्मानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. रोहितनं कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकींग मिळवताना पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. कसोटी सलामीवीरांमध्ये रोहित अव्वल स्थानी आहे.
जो रूटनं भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत तीन शतकांसह १२६.७५च्या सरासरीनं ५०७ धावा केल्या. त्यानं न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. रूट सहा वर्षांनंतर अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रूट पाचव्या क्रमांकावर होता. पण, त्यानं दमदार कामगिरी केली. तिसऱ्या कसोटी सामन्यातील विजयानंत जॉनी बेअरस्टो ( ५ स्थान सुधारणेसह २४व्या क्रमांकावर) व डेवीड मलान ( ८८वा क्रमांक) यांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे.