ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानला डावाच्या फरकानं पराभूत केलं. डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं कुटलेल्या 589 धावांचा पाकिस्तानला दोन्ही डावांत पाठलाग करता आला नाही. डे नाइट कसोटीत ऑसी गोलंदाजांनी पाकच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फार काळ टिकूच दिले नाही. या विजयासह ऑस्ट्रेलियानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवले. या विजयासह त्यांनी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालीकेत आपल्या खात्यात आणखी 120 गुणांची भर घातली.
भारत विरुद्ध बांगलादेश डे नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. भारतानं दुसऱ्या कसोटीत एक डाव व 46 धावांनी विजय मिळवत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड अजून मजबूत केली होती. भारतीय संघ 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, परंतु ऑस्ट्रेलियानं सोमवारी पाकिस्तानला नमवून मोठी भरारी घेतली आहे. ऑस्ट्रेलियानं विजय मिळवत टीम इंडिया आणि त्यांच्यातील गुणांचे अंतर कमी केले आहे.
ऑस्ट्रेलियानं 3 बाद 589 धावांवर पहिला डाव घोषित केला आणि त्याचा पाठलाग करणारा पाकिस्तानचा पहिला डाव 302 धावांत गडगडला. ऑसींच्या खेळीत वॉर्नरचे त्रिशतक महत्त्वाचे ठरले. कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरनं प्रथमच त्रिशतक झळकावले. त्यानं पाक गोलंदाजांची धुलाई करून नाबाद 335 धावा कुटल्या. त्यानं 418 चेंडूंत 39 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 335 धावांची विक्रमी खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. दुसऱ्या डावातही पाकिस्तानची घसरण सुरूच राहिली. नॅथन लियॉनने पाकचा निम्मा संघ माघारी पाठवला. पाकिस्तानला दुसऱ्या डावात 239 धावा करता आल्या. त्यामुळे त्यांना एक डाव व 48 धावांनी पराभव पत्करावा लागला.
भारतीय संघानं मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज ( 2-0), दक्षिण आफ्रिका ( 3-0) आणि बांगलादेश ( 2-0) यांच्यावर निर्भेळ यश मिळवलं आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आतापर्यंत सर्वच्या सर्व सात सामने जिंकले आहेत. या गुणतालिकेत अपराजित राहिलेला हा एकमेव संघ आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एका मालिकेला 120 गुण दिले जातात आणि भारतानं तीनही मालिका जिंकून 360 गुण खात्यात जमा केले आहेत. ऑस्ट्रेलियानं आता दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवून पाकविरुद्धच्या मालिकेतून 120 गुणांची कमाई केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात आता 176 गुण झाले आहेत. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या खात्यात प्रत्येकी 60 गुण आहेत, तर इंग्लंडकडे 56 गुण आहेत.