दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला होता तो भारताचा भरवश्याचा फलंदाज चेतेश्वर पुजारा. पहिल्या सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात 71 धावांची खेळी साकारत पुजाराने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळेच तो सामनावीर पुरस्काराचा मानकरीही ठरला होता. आता तर आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीमध्ये त्याने अव्वल पाच जणांमध्ये मजल मारली आहे.
पुजाराने यावेळी इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वार्नर यांना मागे टाकत क्रमवारीत चौथे स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने 913 गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडकडून 900 गुण पटकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली हा अव्वल स्थानावर विराजमान आहे.
भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने या क्रमवारीत सहावे स्थान पटकावले आहे. अश्विनने यावेळी पॅट कमिन्सला पिछाडीवर सोडत हे स्थान पटकावले आहे.