आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी कसोटी क्रमवारीची ताजी यादी जाहीर केली. त्यात दक्षिण आफ्रिेकेचा कर्णधार आणि फलंदाज डीन एल्गरने मोठी उडी घेत टॉप-१० मध्ये धडक मारली. तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायल जेमिसन याने गोलंदाजांच्या यादीत सहा स्थानांची झेप घेत टॉप-५ मध्ये जागा पटकावली. त्याशिवाय भारतीय फलंदाज ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनाही क्रमवारीत बढती मिळाली. तिघांनीही फलंदाजांच्या यादीत एक-एक स्थानाची बढती घेतली. पण केएल राहुल आणि मयंक अग्रवालची मात्र क्रमवारीत घसरण झाली.
डीन एल्गरने टीम इंडियाच्या विरूद्ध जोहान्सबर्ग कसोटीत ९६ धावांची खेळी केली आणि दक्षिण आफ्रिका कसोटी जिंकवून दिली. या दमदार खेळीच्या जोरावर त्याने ४ स्थानांची झेप घेत १०वे स्थान पटकावले. टॉप-१० क्रमवारीत भारताचे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन फलंदाज आहेत. रोहित यादीत पाचव्या आणि नवव्या स्थानी आहे. तर मार्नस लाबुशेन अव्वल स्थानी कायम आहे.
इतर फलंदाजांपैकी ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना क्रमवारीत १-१ स्थानाची बढती मिळून ते अनुक्रमे २२, २४ आणि २७व्या क्रमाकांवर पोहोचले. राहुल मात्र एका स्थानाच्या घसरणीसह ३४व्या स्थानी पोहोचला. गोलंदाजांच्या यादीत टॉप-१० मध्ये रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे.