ICC Test ranking - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं सातत्यपूर्ण कामगिरी करताना कसोटी क्रमवारीत ( ICC Test ranking) सातव्या क्रमांकावरून अव्वल स्थानापर्यंत प्रवास केला. पण, विराटनं कसोटी संघाचे नेतृत्व सोडले अन् आयसीसीनं जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत टीम इंडियानं अव्वल स्थान गमावले. ऑस्ट्रेलियाचा संघ आता कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे, तर भारताला दोन स्थान खाली घसरावे लागले आहे.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघानं अॅशेस मालिकेत इंग्लंडवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला आणि त्याचा फायदा त्यांना आयसीसी क्रमवारीत झाला. आफ्रिकेनं कसोटी मालिकेत भारतावर २-१ असा विजय मिळवला आणि हे भारताच्या घसरणीचे प्रमुख कारण ठरले. न्यूझीलंडनं दुसरे स्थान कायम राखले आहे. मे २०२०नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आता ११९ रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या खात्यात ११७, तर भारताच्या खात्यात ११६ रेटिंग गुण आहेत. इंग्लंड ( १०१) व दक्षिण आफ्रिका ( ९९) हे अव्वल पाच क्रमांकातील उर्वरित संघ आहेत.
ऑस्ट्रेलियानं अॅशेस मालिका जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यातही दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली आहे. येथेही भारताची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियानं जय-पराजयाच्या ८६.५५ टक्केवारीनुसार हे दुसरे स्थान पटकावले आहे. श्रीलंका १०० टक्क्यांसह अव्वल क्रमांकावर आहे. पाकिस्तान ( ७५.०० टक्के), दक्षिण आफ्रिका ( ६६.६६ टक्के) व भारत ( ४९.०७ टक्के) हे अव्वल पाच संघ आहेत.