आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सननं ( Kane Williamson) फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यानं विराट कोहलीसह ( Virat Kohli) संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत द्विशतकी खेळीचा विलियम्सनला फायदा झाला आहे. ११ डिसेंबरपासून न्यूझीलंड व वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे आणि त्यात विलियम्सनची कामगिरी सातत्यपूर्ण झाल्यास, तो विराटला तिसऱ्या स्थानी जाण्यास भाग पाडू शकतो.
विलियम्सननं विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ४१२ चेंडूंत ३४ चौकार व २ षटकारांसह २५१ धावांची खेळी केली होती. त्याच फायदा त्याला झाला. विलियम्सन व कोहली यांच्या खात्यात प्रत्येकी ८८६ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ ९११ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. टॉप टेनमध्ये चेतेश्वर पुजारा हा दुसरा भारतीय आहे. ७६६ गुणांसह तो सातव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन ८२७ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या टॉम लॅथमनं टॉप टेनमध्ये एन्ट्री घेतली.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये बेन स्टोक्सनं अव्वल स्थानासाठी विंडीजच्या जेसन होल्डरला मागे टाकले.