ICC Test batsman ranking: आयसीसीनं मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला फलंदाजांच्या क्रमवारीतील दुसरे स्थानही गमवावे लागले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर विराट पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतला. सोमवारी विराट-अनुष्का यांच्या घरी नन्ही परी जन्माला आली. कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा फटका विराटला बसला आहे. त्याची थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सननं अव्वल स्थान कायम राखले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर सरकला आहे.
आयसीसीनं जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीनुसार केन ९१९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील द्विशतकानं केनला प्रथमच आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचवले. पाकिस्तानला व्हाईट वॉश देऊन इतिहासात प्रथमच न्यूझीलंडचा संघही अव्वल स्थानी विराजमान झाला. स्मिथनं सिडनी कसोटीत शतकी खेळी केली आणि त्यामुळे तो ९०० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला. विराट ८७० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अजिंक्य रहाणे एक स्थान खाली सरकला असून तो ७५६ गुणांसह ७व्या क्रमांकावर आहे, तर चेतेश्वर पुजारानं दोन स्थानांच्या सुधारणेसह ( ७५३) आठवा क्रमांक पटकावला.
गोलंदाजांमध्ये जोश हेझलवूड तीन क्रमांकाच्या सुधारणेसह पाचव्या स्थानी आला आहे. आर अश्विन व जसप्रीत बुमराह या भारतीय गोलंदाजांना अनुक्रमे दोन व एक स्थान खाली सरकावे लागले.