भारतीय संघानं नुकतीच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 निर्भेळ यश मिळवले. या विजयासह भारतीय संघानं सलग चार कसोटी सामन्यातं डावानं विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नावावर केला. भारताच्या या विजयात गोलंदाजांचे जेवढे योगदान तेवढेच फलंदाजांचेही आहे. त्यातल्या त्यात सलामीवीर मयांक अग्रवाल हा हुकूमी एक्का ठरला आहे. मयांकनं 2019मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत अव्वल स्थान पटकावलं आहे आणि त्याचं बक्षीस त्याला मिळालं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार मयांकनं मोठी झेप घेतली आहे, परंतु त्याचवेळी रोहित शर्मा टॉप टेन फलंदजांमधून बाहेर गेला आहे.
मयांकनं 2019मध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक 974 धावा केल्या आहेत. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सात सामन्यांत मयांकनं 10 डावांमध्ये 3 शतकांसह 677 धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर त्यानं आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत दहाव्या स्थानावर झेप घेतली. त्यानं 700 गुणांसह ही झेप घेतली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( 931) आणि भारताचा कर्णधार विराट कोहली ( 928) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा ( 791) आणि अजिंक्य रहाणे (759) यांनी अनुक्रमे चौथे व तिसरे स्थान कायम राखले आहे. मात्र, हिटमॅन रोहितची 13व्या स्थानावर घसरण झाली आहे.